पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीने वर्चस्व मिळवले आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे विश्‍वास देवकाते आणि उपाध्यक्षपदी विवेक वळसे पाटील यांची निवड झाली. निवडणुकीत देवकाते यांना ५३ मते मिळाली. तर भाजपच्या जयश्री पोकळे यांना फक्त ८ मते मिळाली. तब्बल ४५ मतांनी पोकळे यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या निवडणुकीत शिवसेनेने मतदानावेळी तटस्थ भूमिका घेतली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे जिल्हा परिषदेच्या यंदाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ४४ जागा मिळाल्याने राष्ट्रवादीचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष होणार हे निश्‍चित होते. मात्र तरीही भाजप आणि शिवसेनेने ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. अध्यक्षपदाची लढत दुहेरी आणि उपाध्यक्षपदाची तिरंगी लढत पाहायला मिळाली. तर अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून विश्‍वास देवकाते, भाजपच्या जयश्री पोकळे आणि शिवसेनेच्या आशा बुचके यांनी अर्ज दाखल केला होता. शिवसेनेच्या आशा बुचके यांनी उमेदवारी अर्ज मागे घेऊन तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. अध्यक्षपदाच्या दुहेरी निवडणुकीमध्ये देवकाते यांना ५३, पोकळे यांना ८ मते मिळाली. शिवसेना आणि एक अपक्ष असे १४ सदस्य तटस्थ राहिले. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे विवेक वळसे पाटील, शिवसेनेकडून ज्ञानेश्वर कटके आणि भाजपच्या नितीन मराठे यांनी अर्ज दाखल केला होता. उपाध्यक्षपदाच्या तिरंगी लढतीत विवेक वळसे पाटील यांना ५३, शिवसेनेच्या कटकेंना १३ आणि मराठे यांना ८ मते मिळाली. एक अपक्ष सदस्य गैरहजर राहिला. शिवसेनेच्या ज्ञानेश्वर कटके यांचा वळसे पाटील यांनी ४० मतांनी पराभव केला. दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला पुणे आणि पिंपरी- चिंचवडमध्ये गड राखण्यात अपयश आले. तर पुणे जिल्हा परिषद ताब्यात राखण्यात यश आले. यामुळे आगामी काळात राष्ट्रवादी कशा प्रकारे जिल्ह्यात काम करते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune jilha parishad ncp win vishwas devkate elected zp president poll
First published on: 21-03-2017 at 20:42 IST