पुणे : पुण्यातील नोकऱ्यांवर तंत्रज्ञानातील बदलांचा झपाट्याने परिणाम होत आहे. त्यामुळे या वर्षात कृत्रिम प्रज्ञा (एआय) अभियंत्यांना सुगीचे दिवस आले असून, त्यांच्या नोकऱ्यांमध्ये सर्वाधिक वेगाने वाढ होत असल्याचे वास्तव लिंक्डइनच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.
लिंक्डइनने २०२६ मधील रोजगारातील वाढीचा अहवाल जाहीर केला आहे. लिंक्डइनने नोव्हेंबर २०२५ मध्ये १९ हजार ११३ जणांचे सर्वेक्षण करून हा अहवाल तयार केला आहे. त्यात १८ ते ७९ वर्षे वयाच्या पूर्णवेळ, अर्धवेळ नोकरदार आणि बेरोजगारांचा समावेश आहे. या अहवालानुसार, देशात ७२ टक्के जण नवीन नोकऱ्यांच्या शोधात आहेत. मात्र, तंत्रज्ञानातील बदलांचे आव्हान ३८ टक्के जणांना वाटत असून, ३७ टक्के जण स्पर्धेत आपण कितपत टिकू याबद्दल साशंक आहेत. तंत्रज्ञानातील बदलांचे आव्हान पेलण्यासाठी देशातील एक तृतीयांश उमेदवार तयार नाहीत.
पुण्याचा विस्तार तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाचे केंद्र म्हणून होत आहे. त्यामुळे पुण्यात एआय अभियांत्रिकीच्या नोकऱ्यांत सर्वाधिक वेगाने वाढ होत आहे. त्यानंतर दुसऱ्या स्थानी व्यवसाय विकास सरव्यवस्थापक, तिसऱ्या स्थानी अंडररायटर म्हणजेच वित्तीय जोखमीचे मूल्यांकन करणारा हमीदार, चौथ्या स्थानी विपणन सल्लागार आणि पाचव्या स्थानी विधी सल्लागार आहे. व्यवसाय विकास, वित्तीय सेवा, विपणन, विधी आणि व्यवस्थापनातील नोकऱ्यांमध्ये प्रामुख्याने वाढ होत आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
नोकरीच्या शोधातही एआयचा वापर
भारतात ९४ टक्के नोकरदार नोकरीच्या शोधासाठी एआय साधनांचा वापर करीत आहेत. मात्र, त्यातील निम्म्या म्हणजेच ४८ टक्के जणांना एआयच्या कौशल्यात आपण कुठे बसतो, याची माहिती नाही. कंपन्यांकडून भरती होताना एआय अडथळा ठरू शकतो, असे मत ५४ टक्के जणांनी मांडले आहे. असे असले तरी एआयमुळे कंपन्यांकूडन भरतीतील संवादाची प्रक्रिया अधिक चांगली होऊ शकेल, असा विश्वास ६५ टक्के जणांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, लिंक्डइनवर जगभरात दररोज १३ लाख सदस्य एआय साधनांचा वापर करीत आहेत. हा वापर प्रामुख्याने नोकरीचा शोध घेण्यासाठी होत आहे.
एआय क्षमतेची जोड आवश्यक
पुण्यातील रोजगार बाजारपेठेला प्रस्थापित उद्योग आणि नवोन्मेषावर आधारित नवीन उद्योग आकार देत आहेत. यामुळे व्यापक स्तरावरील कुशल मनुष्यबळाला नोकरीच्या संधी निर्माण होत आहेत. आपल्या मूळ कौशल्याला एआय क्षमतेची जोड देणाऱ्या उमेदवारांना अधिक पसंती मिळत आहे. तंत्रज्ञान क्षेत्रासोबतच निर्मिती, वित्त आणि सल्लागार सेवा या क्षेत्रांमध्ये नोकऱ्या वाढत आहेत, असे लिंक्डइन इंडियाच्या वरिष्ठ व्यवस्थापकीय संपादक निराजिता बॅनर्जी यांनी सांगितले.
पुण्यातील टॉप टेन नोकऱ्या
१) एआय अभियंता
२) व्यवसाय विकास सरव्यवस्थापक
३) अंडररायटर
४) विपणन सल्लागार
५) विधी सल्लागार
६) वित्तीय नियोजन विश्लेषक
७) पुरवठा साखळी उपाध्यक्ष
८) खाते व्यवस्थापक
९) संशोधन मार्गदर्शक
१०) विक्री संचालक
