पुणे : यंदा मोसमी वाऱ्यांना झालेल्या विलंबामुळे जून महिना जवळपास कोरडाच गेला. जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली होती. मात्र, १ जुलैपासून सुरू झालेल्या पावसाने केवळ सहा दिवसांताच संपूर्ण जुलै महिन्याची सरासरी गाठली आहे. त्यामुळे उर्वरित महिन्याभरात होणारा पाऊस आता सरासरीपेक्षा जास्त म्हणून नोंदवला जाणार आहे.

यंदा जूनमध्ये मोसमी वारे तळकोकणात दाखल झाल्यानंतर पुढील प्रगतीसाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली नाही. त्यामुळे मोसमी वाऱ्यांची पुढील प्रगत मंदावली. मोठ्या प्रतीक्षेनंतर मोसमी वारे पुण्यात दाखल झाल्यानंतर टप्पाटप्प्याने पावसाने गती पकडली. विशेषतः १ जुलैपासून घाट परिसरासह शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही पाऊस होत आहे. शहरात तुलनेने पावसाची तीव्रता कमी असली, तरी दिवसभर संततधार होती. मात्र, गेल्या दोन दिवसांत शहर आणि परिसरातही पावसाचा जोर वाढला आहे. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार पुण्यात जुलैमध्ये सुमारे १८५ ते २१४ मिलिमीटर पाऊस पडतो. गेल्या सहा दिवसांत झालेल्या पावसाने पूर्ण जुलै महिन्याची सरासरी पूर्ण केली आहे.

शिवाजीनगर येथे १ ते ६ जुलै या कालावधीत २११.६ मिलिमीटर पाऊल नोंदवला गेला आहे, तर १ जून ते ६ जुलै याकालावधीचा विचार करता २७५.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सहा दिवसांतच जुलैची सरासरी भरून निघाल्याने उर्वरित महिन्याभरात पडणारा पाऊस आता सरासरीपेक्षा अधिक ठरणार आहे.

जुलैमधील चौथ्या क्रमांकाचा एका दिवसातील सर्वाधिक पाऊस

रविवार ते सोमवारी सकाळी साडेआठपर्यंत या २४ तासांत पुण्यातील शिवाजीनगर येथे १०८.४ पाषाण येथे ११३, लोहगाव येथे १४६.८ मिलिमीटर पाऊस पडला. हवामान विभागाच्या आजवरच्या नोंदींनुसार रविवार-सोमवारमध्ये पडलेला पाऊस हा शिवाजीनगर येथे झालेला १०८.४ पाऊस हा एका दिवसातील चौथ्या क्रमांकाचा सर्वाधिक पाऊस ठरला आहे. या पूर्वी एका दिवसातील सर्वाधिक पावसाच्या घटनांमध्ये १९५८मध्ये १३०.४, १९६७मध्ये १२७.९, २०२४मध्ये ११४.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती.