पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणात बांधकाम व्यावासयिक विशाल अगरवाल यााच जामीन रद्द करण्यासाटी पोलिसांकडून न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला आहे. या अर्जावर मंगळवारी ( २३ जून) सुनावणी होणार आहे.

कल्याणीनगर अपघात प्रकरणात न्यायालयाकडून अगरवाल याला जामीन मंजूर करण्यात आला. त्यानंतर समाज माध्यमात अगरवाल आणि कुटुंबीय जल्लोष करतानाची कथित चित्रफीत समाज माध्यमात प्रसारित झाली. पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी या घटनेची दखल घेऊन अगरवाल याचा जामीन रद्द करण्यात यावा, यासाठी प्रयत्न सुरू केले. यासाठी राज्याच्या विधी विभागाची परवानगी मिळविण्यात आली. त्यानंतर या प्रकरणी शिवाजीनगर येथील सत्र न्यायालयात विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी शनिवारी (२० जून) अर्ज दाखल केला.

कल्याणीनगर भागात भरधाव मोटारीने दुचाकीस्वार संगणक अभियंता तरुण-तरुणीला धडक दिली होती. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात अगरवाल याच्या अल्पवयीन मुलासह मित्रांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांच्या रक्ताचे नमुने बदलण्यासाठी अगरवाल आणि साथीदारांनी ससूनमधील डाॅक्टरांशी संगनमत केले होते. ही बाब तपासात उघडकीस आल्यानंतर विशाल अगरवाल याला अटक करण्यात आली होती. त्याचा जामीन फेटाळण्यात आला होता. त्यानंतर अगरवालने सर्वोच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता.

सर्वोच्च न्यायालायने कठोर अटी, शर्तींवर अगरवालचा जामीन मंजूर केला होता. जामीन मिळाल्यानंतर अगरवाल याची कुटुंबीयांसोबत जल्लोष करताना कथित चित्रफीत प्रसारित झाली होती. समाज माध्यमात ही चित्रफीत प्रसारित झाल्यानंतर पोलिसांनी दोघांचे जबाब नोंदवून घेतले होते. जबाब आणि डिजिटल पुरावे न्यायालयात सादर केले जाणार आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने अगरवाल याला घालून दिलेल्या अटींचा भंग झाल्याचे न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या अर्जात म्हटले आहे. अगरवाल याला जामीन मिळाल्यानंतर जल्लोष करताना कथित चित्रफीत प्रसारित झाली. अशा कृत्यामुळे साक्षीदारांवर दबाब येण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली जाणार आहे. या अर्जावर मंगळवारी (२३ जून) न्यायालयात सुनावणी होणार आहे. अगरवाल याला याबाबत ‘म्हणणे’ मांडण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. – शिशिर हिरे, विशेष सरकारी वकील