पुणे : कर्वे रस्त्यावरील जलसा हॉटेलसमोर झालेल्या भीषण अपघातात ६० वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. संबंधित महिला मुलाच्या दुचाकीवर मागे बसून जात असताना, सिग्नल सुटल्यावर एका दुचाकीस्वाराने निष्काळजीपणे वाहन वळवताना महिलेच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे महिला रस्त्यावर पडली. मागून येणाऱ्या मालवाहू वाहनाचे चाक त्यांच्या अंगावरून गेले.

सिताबाई अजिनाथ शिंदे (वय ६०) असे या अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत त्यांचा मुलगा तुळशीदास अजिनाथ शिंदे (वय ३८, रा. संभानगर झोपडपट्टी, कर्वेनगर) यांनी अलंकार पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (३ फेब्रुवारी) सकाळी सव्वाआठच्या सुमारास तुळशीदास शिंदे हे आईसोबत दुचाकीवरून जात होते. कर्वे रस्त्यावर जलसा हॉटेलसमोर सिग्नल सुटल्यानंतर एका दुचाकीस्वाराने उजव्या बाजूने अचानक वाहन वळवत त्यांच्या दुचाकीला धडक दिली आणि पुढे निघून गेला. या धडकेत तुळशीदास व त्यांची आई रस्त्यावर पडले. त्याच वेळी शेजारून जाणाऱ्या टेम्पोचे मागील डाव्या बाजूचे चाक सिताबाई शिंदे यांच्या छातीवरून गेले. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या आणि त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, अलंकार पोलीस सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे त्याचा शोध घेत आहेत.