पुणे : भरदिवसा कर्वे रस्त्यावर एकाचा खून करणाऱ्या दोघांना प्रमुख जिल्हा न्यायाधीश महेंद्र महाजन यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाने दिलेला मृत्यूपूर्व जबाब, वैद्यकीय तज्ज्ञांची साक्ष, तसेच प्रत्यक्षदर्शींची साक्ष ग्राह्य धरून आरोपींना दोषी ठरवून शिक्षा सुनावली.

संजय अनंत मोहोळ (वय ३९, रा. दत्तवाडी) आणि संभाजी सदाशिव कांबळे (वय २७, रा. कोथरूड) अशी जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत. सागर शिवाजी शिंदे (वय ३१, रा. कर्वे रस्ता) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. शिंदे यांचे वडील शिवाजी शिंदे यांनी याबाबत अलंकार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. सागर शिंदे हे कर्वे रस्त्यावरील एका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे माजी अध्यक्ष होते.

आरोपी संजय मोहोळ याचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते. त्याचा इमारतीतील रहिवाशांना त्रास होत होता. शिंदे यांनी मोहोळला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. शिंदे यांनी मोहोळला मारहाण केली होती. कांबळे याला मोहोळचीसंगत सोडण्याची ताकीद दिली होती. शिंदे यांनी केलेल्या मारहाणीनंतर आरोपी त्याच्यावर चिडून होते.

दोघा आरोपींनी त्यांचा खून करण्याचा कट रचला होता. २३ फेब्रुवारी २०१६ रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास दुचाकीस्वार शिंदे हे कर्वे रस्त्यावरुन करिष्मा सोसायटीकडे निघाले होते. आरोपी मोहोळ आणि कांबळे हे मोटारीतून त्यांचा पाठलाग करत होते. करिष्मा सोसायटीजवळील चौकात भरधाव मोटारीने दुचाकीस्वार शिंदे यांना धडक दिली. शिंदे रस्त्यात पडले.

त्याानंतर जीव वाचविण्यासाठी ते पळाले. आरोपींनी पाठलाग करुन शिंदे यांच्यावर कोयत्याने वार केले, तसेच त्यांच्या डोक्यात दगड घातला. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात शिंदे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.उपचारादरम्यान त्यांनी मृत्यूपूर्व जबाब पोलिसांसमोर दिला हाेता. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात आरोपी मोहोळ आणि कांबळे यांना अटक करण्यात आली.

पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. या खटल्यात सरकार पक्षाकडून प्रमुख जिल्हा सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी बाजू मांडली. सरकार पक्षाने १८ साक्षीदारांची साक्ष नोंदविली. मृत्यूपूर्व जबाब, वैद्यकीय तज्ज्ञांची साक्ष ग्राह्य धरुन आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. न्यायालयाने आरोपींना २७ हजार रुपयांचा दंड ठोठावला असून, मृताचे वडील आणि मुलांना ही रक्कम देण्यात यावी, तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त दोन महिने कारावास भोगावा लागेल, असे न्यायालायने निकालपत्रात नमूद केले आहे.