पुणे : काँग्रेसमधून शिवसेना (शिंदे) पक्षात प्रवेश केलेल्या माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे प्रल्हाद गवळी आता भाजपच्या राजकीय व्यासपीठावर सक्रिय झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७६ व्या वाढदिवसानिमित्त कसबा विधानसभा मतदार संघातील रविवार पेठेत संत नामदेव चौकात पंतप्रधान मोदी यांची २० फूट बाय २० फूट आकाराची भव्य रांगोळी काढली.

माजी आमदार धंगेकर यांच्या भागातच गवळी यांनी भव्य रांगोळी काढून मोदींना शुभेच्छा दिल्या. तसेच ७६ दिवे पेटवून आणि ७६ किलो पेढ्यांचे वाटप करून पंतप्रधानांच्या वाढदिवसाचा आनंदोत्सव साजरा केला. यामुळे गवळींच्या राजकीय प्रवासातील बदलाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

लोककल्याण प्रतिष्ठान, प्रल्हाद गवळी मित्र परिवार आणि भाजप पुणे शहर यांच्या वतीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. संत नामदेव चौकात साकारलेल्या भव्य रांगोळीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी ही रांगोळी पुढील पाच दिवस पुणेकरांना पाहता येणार आहे.

धंगेकरांपासून दुरावले, भाजपमध्ये प्रवेश !

गवळी हे काही काळापूर्वी माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचे कट्टर समर्थक म्हणून परिचित होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून गवळी आणि धंगेकर यांच्यातील संबंध बिघडल्याचे बोलले गवळी यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत काही महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रांगोळी आणि दीपप्रज्वलनाचा उपक्रम राबवित त्यांनी भाजपशी आपली राजकीय जवळीक अधोरेखित केली आहे.

कधीकाळी धंगेकरांच्या राजकीय वर्तुळात दिसणारे गवळी आता भाजपच्या कार्यक्रमांमध्ये पुढाकार घेताना दिसत आहेत. त्यामुळे हा केवळ वाढदिवसाचा कार्यक्रम नसून गवळींच्या बदललेल्या राजकीय भूमिकेचे सार्वजनिक प्रदर्शन असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

७६ दिवे, ७६ किलो पेढे

रविवार पेठेतील संत नामदेव चौकात २० फूट बाय २० फूट आकाराची रांगोळी काढण्यात आली. तसेच ७६ दिवे पेटवून आणि ७६ किलो पेढ्यांचे वाटप करून नागरिकांसोबत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. रांगोळी पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली असून, उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे आयोजकांनी सांगितले.

“वाढदिवस केवळ औपचारिक न ठेवता सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमातून साजरा करण्याचा आमचा प्रयत्न आहे. नागरिकांचे प्रेम, सहकार्य आणि उत्स्फूर्त सहभागामुळे हा उपक्रम संस्मरणीय ठरला,” अशी भावना प्रल्हाद गवळी यांनी व्यक्त केली.

‘मूर्ती तुमची, किंमत तुमची’चा उल्लेख

गवळी यांनी यापूर्वी ‘मूर्ती तुमची, किंमत तुमची’ या उपक्रमांतर्गत पाच हजार गणपती मूर्तींचे वाटप करण्यात आल्याचेही सांगितले. सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांशी संपर्क वाढविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांच्या भूमिकेतून स्पष्ट झाले आहे. ज्या भागातून धंगेकर यांनी भाजपला आव्हान दिले त्याच भागात भाजपचे उपक्रम राबवून पक्षाची निष्ठा जपण्याचे काम गवळी करत असल्याचे बोलले जात आहे.

भाजप पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

या उपक्रमास भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आणि पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते. यामध्ये राजेंद्र काकडे, भाजप राष्ट्रीय लीगल सेल कमिटीचे सदस्य हिरसिंग राजपुरोहित, मंडल अध्यक्ष छगन बुलाखे, सरचिटणीस माधव साळुंके, अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष सुनील खंडागळे, उपाध्यक्ष प्रशांत बढाई, अजय बढाई, विलास सिन्नरकर, साईनाथ चकोर, प्रशांत बल्ला, आदेश अवघडे, सोनाली थोपटे, विकास गवळी, विक्रम लगड यांचा समावेश होता.