पुणे : दोन इमारतीच्या मधोमध असलेल्या अरुंद जागेत चेंडू काढण्यासाठी शिरलेला सात वर्षांचा मुलगा अडकल्याची घटना कात्रज भागातील जांभुळवाडीत मंगळवारी घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी भिंतीत अडकलेल्या मुलाची सुटका केली. जवानांच्या प्रयत्नांमुळे अनर्थ टळला.
कात्रज परिसरातील जांभुळवाडी परिसरात गोविंद बेसील ही सोसायटी आहे. या इमारतीच्या गच्चीवर मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास रणवीर चेतन चव्हाण (वय ७) हा क्रिकेट खेळत होता. गोविंद बेसिल या सोसायटीला लागून दुसरी सोसायटी आहे. मधोमध अरुंद जागा आहे. क्रिकेट खेळताना चेंडू अरुंद जागेत पडल्यानंतर रणवीर उतरला. चेंडू काढण्यासाठी उतरलेला रणवीर दोन भिंतीत अडकला. त्याला अरुंद जागेतून बाहेर पडता येत नव्हते. त्याचा आरडाओरडा ऐकून रहिवाशी गच्चीवर गेले. तेव्हा मुलगा अरुंद जागेत अडकल्याचे दिसून आले. तो बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, त्याला बाहेर पडता येत नव्हता. मुलगा घाबरला होता. रहिवाशांनी अरुंद जागेत दोर सोडून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, घाबरलेल्या रणवीरला बाहेर पडता आले नाही.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. अरुंद जागा असल्याने मदतकार्यात अडथळे आले. अखेर जवानांनी हायड्रोलिक ब्रेकरचा वापर करुन भिंतीचा काही भाग तोडला. उपकरणाचा वापर करुन भिंतीतील सळई कापण्यात आली. अरुंद जागेत अडकलेल्या रणवीरची जवानांनी सुखरुप सुटका केली. प्रभारी उपअग्निशमन अधिकारी संतोष भिलारे, जवान किरण पाटील, मयूर काटे, प्रशांत कुंभार, बंडू गोगावले यांनी ही कामगिरी केली. रहिवाशांनी जवानांच्या कामगिरीचे कौतुक केले.
