पुणे : मुंबई – बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवीन कात्रज बोगद्याजवळ कंटेनरवर मोटार आदळून एकाचा मृत्यू झाला. अपघातात मोटारीतील दोघे जण जखमी झाले. या प्रकरणी कंटेनरचालकाविरुद्ध आंबेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

रघुनाथ मारुती घारे (वय ५५, रा. कोपरखैरणे, नवी मुंबई) असे मृत्यमुुखी पडलेल्या मोटारीतील प्रवाशाचे नाव आहे. अपघातात घारे यांचे नातेवाईक संजय चाळके, नात गाथा हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी कंटेनरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंटेनरचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत मोटारचालक रोहित रघुनाथ घारे (वय २५, रा. कोपरखैरणे, नवी मुंबई) यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोटारचालक रोहित घारे, त्यांचे वडील रघुनाथ, वडिलांचे मामा संजय चाळके, तसेच भाची गाथा हे गुरुवारी (३० एप्रिल) दुपारी मोटारीतून मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरुन निघाले होते. त्या वेळी नवीन कात्रज बोगद्याजवळ भरधाव कंटेनरने अचानक मार्गिका बदलली.

याबाबत सूचना दिली नाही. कंटेनरचालकाने ‘इंडिकेटर’ दाखविला नाही. कंटेनरच्या एका बाजूवर मोटार आदळली. मोटारीतील प्रवासी गंभीर जखम झाले. मोटार चालक रोहित यांना दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी अपघातग्रस्त मोटारीतील चौघांना बाहेर काढले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल झाले. गंभीर जखमी झालेले मोटारीतील प्रवासी रघुनाथ घारे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

पोलिसांनी कंटेनरचालकाला ताब्यात घेतले. कंटनेर चालकाच्या चुकीमुळे अपघात झाल्याचे मोटार चालक रोहित घारे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण डोईफोडे तपास करत आहे. बाह्यवळण मार्गावर गंभीर स्वरुपाचे अपघात यापूर्वी घडले आहेत. बहुतांश अपघात हे वाहनचालकांची चूक, तसेच वेगामुळे घडले आहेत. बाह्यवळण मार्गावर वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. वेगमर्यादेचे पालन न केल्यामुळे गंभीर अपघात घडतात, अशी माहिती पोलिसांनी दिली.

खराडीत दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यू

खराडी परिसरात दुचाकीच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. नरसिंग जमन्ना जंगले (वय ६८, रा. पाटीलबुवानगर, खराडी) असे मृत्यमुुखी पडलेल्या पादचारी ज्येष्ठाचे नाव आहे. याबाबत नरसिंग यांचा मुलगा कृष्णा (वय ३८) यांनी खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरसिंग हे खराडीतील झेन्सार कंपनी रस्त्यावरुन निघाले होते. त्या वेळी भरधाव दुचाकीने पादचारी नरसिंग यांना धडक दिली. अपघातात ते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता दुचाकीस्वार पसार झाला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या नरसिंग यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक आवारे तपास करत आहेत.