पुणे : कात्रज भागातील मांगडेवाडी परिसरात मृतावस्थेत सापडलेल्या महिलेच्या खुनाचा उलगडा गुन्हे शाखेने केला. या प्रकरणात रिक्षाचालकासह सहा जणांना अटक करण्यात आली. खून केल्यानंतर पकडले जाण्याची भीती असल्याने रिक्षा चालकाने रिक्षाच्या छतावरील कापड (हूड) बदलल्याचे तपासात उघडकीस आले.

या प्रकरणी रिक्षाचालक केशव कमलेश चौधरी (वय २०, रा. भारतनगर, कात्रज), सोनू लक्ष्मण पवार (वय १८), अब्दुल मोहंमद शेख (वय २३), महादेव अर्जुन व्होरडे (वय ४०), साई अमित पुजारी (वय १९), सोहेल हनिफ खान (वय २१) यांना अटक करण्यात आली. आरोपी साई पुजारी, सोनू पवार हे सराइत आहेत. कात्रजमधील मांगडेवाडीत असलेल्या खाणीत एका ४० वर्षीय महिलेचा मृतदेह पोलिसांना १० फेब्रुवारी रोजी सापडला होता. या प्रकरणी सुरुवातीला भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली होती.गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा समांतर तपास करण्यात येत होता.

पोलिसांना धागेदाेरे सापडले नव्हते. कात्रज घाटासह परिसरातील ९७ ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण पोलिसांनी तपासले होते. चित्रीकरणात रिक्षा आढळून आली होती. या रिक्षाचा क्रमांकावरुन तपास करण्यात आला. रिक्षा चालक चौधरीला ताब्यात घेण्यात आले. चाैकशीत त्याने साथीदारांच्या मदतीने महिलेला खाणीत ढकलून दिल्याची कबुली दिली. पकडले जाण्याची भीती वाटल्याने त्याने गु्न्हा केल्यानंतर रिक्षाचे हुड बदलल्याचे उघडकीस आले.

गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त शैलेश संखे यांच्य मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप, सहायक निरीक्षक अमोल रसाळ, उपनिरीक्षक संजय जाधव, विजय पवार, विशाल दळवी, प्रवीण उत्तेकर, साधना ताम्हाणे, शंकर कुंभार, विनोद चव्हाण, योगेश मांढरे, संदीप शिंर्के यांनी ही कामगिरी केली.

खूनामागचे कारण काय ?

कात्रज परिसरात १० फेब्रुवारी रोजी महिलेने रिक्षा थांबविली. महिलेने आरोपींना कात्रज परिसरातील एका हाॅटेलजवळ सोडण्यास सांगितले. रिक्षाचालक आरोपी चौधरीचे साथीदार अब्दुल शेख, सोनू पवार हे रिक्षात होते. शेख आणि पवार यांनी मद्यप्राशन केले होते. महिलेला सोडण्याचा बहाणा करुन आरोपींनी तिला मांगडेवाडी परिसरात नेले. आरोपींनी महिलेवर अतिप्रसंग केल्याची शक्यता आहे. महिलेने विरोध केल्यानंतर तिला खाणीत ढकलून दिल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.