पुणे : जिल्ह्याधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी करून २४ एकर जागा अकृषक (एनए) म्हणून आदेश तयार करण्यात आल्याचा प्रकार पुढे आला आहे. हवेली तालुक्यातील केसनंद येथील गट नंबर १७२ मध्ये हा प्रकार आढळून आला असून तलाठ्याच्या दक्षतेमुळे हा प्रकार वेळीच रोखणे शक्य झाले आहे. दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित जमीन मालकाविरोधात पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, केसनंद येथील बाबासाहेब हरगुडे यांची सुमारे एक लाख चौरस मीटर (सुमारे २४.७१ एकर) इतकी जमीन आहे. ‘एनए’ झाल्याची नोंद करण्यासाठी हरगुडे यांनी केसनंद येथील तलाठी शुभम वाबळे यांच्याकडे अर्ज केला होता. त्या अर्जाबरोबर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या नावे सहीद्वारे आदेश जोडले होते. त्याशिवाय, उपनिवासी जिल्हाधिकारी ज्योती कदम, लोणी काळभोरच्या अपर तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांच्या बोगस सह्यांच्या पत्रासह ‘पीएमआरडीए’च्या अधिकाऱ्यांच्या बोगस सहीद्वारे झोन दाखलादेखील मिळविला. भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक विकास गोफणे यांचीही बोगस स्वाक्षरीचे पत्र जोडल्याचे नमूद करण्यात आले आहे. या कागदपत्रांची तलाठी वाबळे यांनी तपासणी केली.
अपर तहसीलदार कोलते पाटील या पूर्वी हवेलीच्या तहसीलदार होत्या. मात्र, सध्या लोणी काळभोर येथील अपर तहसील कार्यालयाच्या अपर तहसीलदार आहेत. त्यांच्या बोगस सहीचे पत्र आढळले. त्यात कोलते पाटील यांची सही बोगस असल्याचे ओळखतानाच त्या पत्रात वरील बाजूस ‘अपर तहसीलदार लोणी काळभोर’ असा उल्लेख असणे आवश्यक होते. त्याऐवजी ‘तहसीलदार हवेली’ असे कार्यालयाचे नाव लिहिल्याचे आढळले. त्यावरून हे पत्र बोगस असल्याची खात्री तलाठ्याला झाली.
त्यावरून हरगुडे यांनी सरकारची फसवणूक करून, महसूल बुडविण्याच्या हेतूने नोंदीसाठी अर्ज केल्याचे स्पष्ट झाले. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन अपर तहसीलदार कोलते पाटील यांनी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, यांच्यासह जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या निदर्शास हे बोगस सह्यांचे प्रकरण आणून दिले. त्या प्रकरणांची जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतली.
दरम्यान, संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश अपर तहसीलदारांना देण्यात आले असून, त्या संदर्भातील कार्यवाही सुरू असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी सांगितले.
