पुणे : ‘केतन अगरवाल याची हत्या करण्यापूर्वी आरोपी चेतन चौधरी, रितेश हंगे आणि सिया गोयल यांनी चर्चा केली होती. हत्येसाठी त्रयस्थाची मदत घेण्याचा विचार करण्यात आला होता. मात्र, या कटात अन्य कोणाला सामील करण्यापेक्षा केतनची हत्या चेतन आणि सिया यांनी करण्याचा कट रचला. या कटात रितेश सामील असल्याची माहिती तपासात निष्पन्न झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली,’ अशी माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी दिली.

‘केतन अगरवाल हत्या प्रकरणात तिसरा आरोपी रितेश हंगे याला नुकतीच अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला १२ सप्टेंबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. रितेश आणि चेतन हे दोघे महाविद्यालयीन मित्र आहेत. रितेश याचे शिक्षण बीबीएपर्यंत झाले असून, तो बांधकाम क्षेत्राशी एका कंपनीत कामाला आहे’, असे पोलीस अधीक्षक गिल यांनी सांगितले.

‘तांत्रिक तपासात रितेश याच्याविरद्ध ठोस पुरावे मिळाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. चेतन, रितेश आणि सिया हे केतनच्या हत्येपूर्वी संपर्कात होते. समाज माध्यमातून त्यांच्यात संवाद झाला होता. हा संवाद त्यांनी काढून (डिलिट) टाकला होता. पोलिसांनी तांत्रिक तपासात काढून टाकलेला संवाद परत (रिकव्हर) मिळविला. या बाबत ठोस पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. केतनच्या हत्येपूर्वी चेतनने रितेशशी चर्चा केली होती. कलम ६१(२) नुसार गुन्ह्याची माहिती असणे, गुन्ह्याच्या कटात सामील हाेणे, हे गुन्हेगारी कृत्य आहे. चेतनने गुन्हा केल्यावर तो रितेशला जाऊन भेटला होता. त्याने गुन्हा केल्याची माहिती दिली. केतनची हत्या करण्यापूर्वी चेतन, रितेश आणि सिया बाहेरील व्यक्तीला या कटात सामील करण्यासाठी प्रयत्न करत होते’, असे पोलीस अधीक्षक गिल यांनी सांगितले.