पुणे : हवाई दलातील ‘सार्जंट’चा कालव्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना खडकवासला परिसरात घडली. कालव्यात बुडालेल्या कर्मचाऱ्याचा मृतदेह सोमवारी दुपारी नांदेड फाटा परिसरातील कालव्यात सापडला.
राजेशकुमार वर्मा (वय ३५) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. वर्मा हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (एनडीए) नियुक्तीस होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (३१ मे) वर्मा हे सहकाऱ्यांसोबत खडकवासला येथील कालव्यात पोहायला गेले होते. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडाले. त्यानंतर या घटनेची माहिती सहकाऱ्यांनी पोलिसांना दिली. ‘एनडीए’चे पथक घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दल, तसेच एनडीएतील पथकाने कालव्यात बुडालेल्या वर्मा यांचा शोध घेतला. रविवारी सायंकाळपर्यंत शोधमोहीम राबविण्यात आली. अंधार पडल्यानंतर शोधमोहीम थांबविण्यात आली.
त्यानंतर सोमवारी दुपारी चारच्या सुमारास वर्मा यांचा मृतदेह सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाटा परिसरातील कालव्यात सापडला. त्यानंतर त्यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. या प्रकरणी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली.
कालव्यात वाहून निघालेली महिला बचावली
कालव्यात बुडालेल्या वर्मा यांचा शोध घेताना अग्निशमन दलाच्या जवानांना पाण्याचा प्रवाहात वाहून चाललेल्या महिलेला पाहिले. जवानांनी प्रसंगावधान राखून महिलेला वाहून निघालेल्या महिलेला पाण्यातून बाहेर काढले. त्यानंतर ‘एनडीए’च्या वैद्यकीय पथकाने तिच्यावर प्रथमोपचार केले. महिलेला उपचारांसाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.
