पुणे : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठा गेल्या दहा वर्षांतील नीचांकी पातळीवर पोहोचला होता. मात्र, गेल्या चार दिवसांत झालेल्या पावसाने धरणसाखळीतील पाणीसाठ्यामध्ये १ टीएमसीने वाढ झाली आहे.खडकवासला धरण साखळीतील खडकवासला, वरसगाव, पानशेत, टेमघर या धरणसाखळीतून पुण्याला पाणीपुरवठा केला जातो. गेल्यावर्षी मे महिन्यातच मोसमी वारे दाखल होऊन पाऊस सुरू झाला होता. मात्र, यंदा मोसमी वारे कोकणात दाखल झाल्यानंतर पुढील प्रगतीसाठी स्थिती अनुकुल नव्हती.

परिणामी, धरणातील पाणीसाठा कमी होत असल्याने पाण्याच्या नियोजनासाठी पुणे महापालिकेने १५ जूनपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. पाऊस लांबल्याने पावसाच्या हंगामातील जून महिना कोरडाच गेला. परिणामी, धरणसाखळीतील पाणीसाठा गेल्या दहा वर्षांतील नीचांकी पातळीवर गेला. १ जुलै रोजी चार धरणांमध्ये मिळून एकूण पाणीसाठ्याच्या १२.५७ टक्के, म्हणजे ३.६६ टीएमसी पाणीसाठा होता. गेल्यावर्षी १ जुलै रोजीच धरणसाखळीत १४.९० टीएमसी पाणीसाठा होता. धरणे ५१ टक्क्यांपेक्षा अधिक भरलेली होती.

गेल्या चार दिवसांत शहर आणि घाट परिसरात सातत्याने पाऊस पडत आहे. त्यात शहराच्या तुलनेत घाटमाथ्यावरील पावसाचे प्रमाण जास्त आहे. घाट परिसरात पडत असलेल्या पावसामुळे धरणसाखळीतील जलसाठ्यात चांगल्या प्रकारे वाढ झाली आहे. चार दिवसांत पडलेल्या पावसामुळे धरणसाखळीतील पाणीसाठा आता १६.०६ टक्के, म्हणजेच ४.६० टीएमसी झाला आहे. त्यामुळे १ ते ४ जुलै या कालावधीत धरणसाखळीतील पाणीसाठ्यात १.०२ टीएमसीने वाढ झाली आहे. त्यामुळे पुणेकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. गेल्या वर्षी ४ जुलै रोजी धरणांमध्ये ५८.५३ टक्के, म्हणजे १७.१५ टीएमसी पाणीसाठा होता.

धरणे भरण्याकडे लक्ष

हवामान विभागाने जुलैमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. धरणसाखळीतील पाणी साठवण क्षमता २९ टीएमसी आहे. चारही धरणे भरण्यासाठी आणखी मोठ्या प्रमाणात पावसाची गरज आहे. धरणे पूर्ण भरल्यास शहराचा पाणीपुरवठा, शेतीसाठीच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन करता येणार आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवस घाट परिसराला ‘रेड अलर्ट’ दिला असून, काही ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार, तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात आणखी काही प्रमाणात भर पडण्याची शक्यता आहे. मात्र, चारही धरणे कधी भरतात, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.