पुणे : खडकवासला धरण ते फुरसुंगीपर्यंत शहरातून वाहणारा मुठा उजवा कालवा बंद करून त्याऐवजी भूमिगत बोगदा तयार करण्याच्या कामाने वेग घेतला आहे. या कामांतर्गत खडकवासला, धायरी, वडाचीवाडी आणि उरुळी देवाची या चार ठिकाणी मिळून दोन किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे काम पूर्ण झाले असून, २०२९ पर्यंत संपूर्ण काम करण्याचे नियोजन जलसंपदा विभागाकडून करण्यात आले आहे.
खडकवासला धऱणापासून ते फुरसुंगीपर्यंत भूमिगत जलवाहिनी टाकण्यासाठी २८ किलोमीटर बोगद्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. खडकवासला ते फुरसुंगी दरम्यानच्या मुख्य बोगद्यापर्यंत पोहोचण्यासाठी ॲप्रोच बोगदा तयार करावा लागणार आहे. त्यासाठी शहरात चार ठिकाणी कामे सुरू करण्यात आली आहे. त्यात वडाचीवाडी, उरुळी देवाची या दोन ठिकाणी काम सुरू करण्यात आले आहे.
वडाचीवाडी येथे ९५० पैकी ४०० मीटरचा, तर उरुळी देवाची येथे ८५०पैकी ३०० मीटर असे सुमारे सातशे मीटरच्या बोगद्याच्या खोदाईचे काम पूर्ण झाले आहे. खडकवासला आणि धायरी येथील बोगद्याचे कामही पूर्ण झाल्याची माहिती जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. मेघा इंजिनिअरिंग या कंपनीमार्फत या बोगद्याचे काम सध्या सुरू आहे.
कामासाठी कंपनीने हैदराबादहून कर्मचारी, अभियंत्यांची कुमक दिली असून, बोगदा तयार करण्यासाठी ड्रिल आणि ब्लास्टिंग पद्धतीचा वापर केला जात आहे. कंपनीने आरएमसी प्लाण्ट, क्रशर, पोकलेन, .ट्रीपर, गुणनियंत्रण प्रयोगशाळा उपलब्ध केली आहे. तसेच ‘क्वालिटी कंट्रोल विंग’ सुरू केला आहे. मुख्य बोगद्यापर्यंत जाण्यासाठीच्या बोगदा तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
मुख्य बोगद्यापर्यंत पोहोचण्यासाठी आतापर्यंत खोदाई केलेला ७०० मीटर अंतराचा बोगदा दुहेरी वाहतूक करणे शक्य होईल इतक्या लांबी, रुंदीचा आहे. बोगद्याचा व्यास ६.३ मीटर असून, बोगद्याचे काम पूर्ण होत जाईल, तसे आतील भागातून सिमेंट काँक्रिटचे अस्तरीकरण करण्यात येणार आहे. रॉक बोल्ट, शॉक क्रिट यांसारख्या उपाययोजना करण्यात येणार आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, नवीन उजवा मुठा कालवा फुटीच्या घटनेनंतर या कामाचाही वेग वाढविण्याचे नियोजन जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी केले आहे. येत्या तीन वर्षांत हे काम पूर्ण करण्यात येईल, असा दावा अधिकाऱ्यांकडून केला जात आहे.
फायदा काय ?
खडकवासला धरणातून सोडण्यात येणारे पाणी मुठा उजवा कालव्यातून वाहताना त्यामध्ये कचरा आणि अन्य अनेक घटकांमुळे प्रदूषित होते. याशिवाय कालव्यातून पाण्याची गळती आणि चोरीही होते. त्यामुळे पाणीपुरवठा करताना ज्या अडचणी येतात, त्या दूर करण्यासाठी खडकवासला ते फुरसुंगी या दरम्यान शहरातून जाणारा कालवा बंद करून पाणी नेण्यासाठी भूमिगत बोगदा करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पातून तीन अब्ज घनफूट (टीएमसी) पाण्याची बचत होणार आहे.
