पुणे : वाहनाच्या चाकाखाली सापडून दोन वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना खराडी परिसरात घडली. या प्रकरणी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
मयूर अमर माळवे (वय २) असे मृत्यूमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे. या प्रकरणी पिकअप वाहन चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पूनम अमर माळवे (वय २५, रा. ढोले पाटील वाडा, खराडी ) यांनी खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूनम माळवे यांचा दाेन वर्षांचा मुलगा गुरुवारी (२९ जानेवारी) सायंकाळी सातच्या सुमारास घरासमोरील माेकळ्या जागेत खेळत होता. मोकळ्या जागेत गोठा आहे.
दूध वाहतूक करणारे पिकअप वाहन चालक तेथे आला होता. मोकळ्या जागेत खेळणारा मयूर वाहनाच्या चाकाखाली सापडल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे यांनी घटनास्थळी भेट दिली. पिकअप वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक गोडसे तपास करत आहेत.
चार दिवसांपूर्वी खराडीत सोसायटीच्या आवारात खेळणाऱ्या पाच वर्षांच्या बालकाचा मोटारीच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना घडली होती. शहरात भरधाव वाहनाच्या धडकेत पादचारी, वाहनचालक मृत्युमुखी पडण्याच्या घटना वाढल्या आहेत. गेल्या वर्षी शहराच्या वेगवेगळ्या भागात झालेल्या अपघातात २४० जणांचा अपघातात मृत्यू झाला होता. बहुतांश अपघात हे वाहनचालकांच्या चुकीमुळे झाले आहेत. स्वारगेट येथील देशभक्त केशवराव जेधे चौकात ट्रकच्या धडकेत सायकलस्वार ज्येष्ठ नागरिक मृत्युमुखी पडण्याच्या घटना नुकतीच घडली होती.
पादचारी तरुणाचा मृत्यू
पुणे-सोलापूर रस्त्यावर टँकरच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याची ओळख पटलेली नाही. पोलिसांकडून त्याची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. याबाबत रमजान इस्माइल शेख (वय ३०, रा. रामोशी आळी, हडपसर गाव) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, टँकर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ जानेवारी राेजी दुपारी पावणेचारच्या सुमारास भरधाव टँकर पुणे-सोलापूर रस्त्यावरुन निघाला होता. हडपसर भाजी मंडईसमोर रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला टँकरने धडक दिली. अपघातात पादचाऱ्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी टँकर चालकाविविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला.

