पुणे : नैराश्यातून तरुणाने पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना खराडी भागातील एका हाॅटेलमध्ये घडली. या प्रकरणी खराडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक चौकशीत विवाह ठरत नसल्याने तरुणाने आत्महत्या केली असल्याची माहिती मिळाली आहे.अक्षय कालिदास कांबळे (वय २६, रा. पूर्वरंग सोसायटी, पेरणे फाटा, पुणे-अहिल्यानगर रस्ता) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय हा कोरेगाव भीमा येथील एका राष्ट्रीयकृत बँकेत कंत्राटी पद्धतीवर काम करत होता. २७ ऑक्टोबर रोजी खराडीतील तुळजाभवानीनगर येथील एका हाॅटेलमध्ये तो राहण्यासाठी आला. तिसऱ्या मजल्यावरील खोली त्याने घेतली होती. २९ ऑक्टोबर रोजी दुपारपर्यंत त्याने खोलीचा दरवाजा उघडला नाही. त्यामुळे हाॅटेलमधील कर्मचाऱ्यांना संशय आला. कर्मचाऱ्यांनी खोलीचा दरवाजा वाजविला. मात्र, त्याने प्रतिसाद दिला नाही. या घटनेची माहिती हाॅटेलमधील कर्मचाऱ्यांनी खराडी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. खोलीचा दरवाजा उघडण्यात आला. तेव्हा अक्षय रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याच्या हातात पिस्तूल होते. त्यानंतर या घटनेची माहिती अक्षयच्या कुटुंबीयांना देण्यात आली. वडील आणि भावाने त्याची ओळख पटविली.
अक्षयने कपाळाच्या मधोमध पिस्तूल ठेवून गोळी झाडून घेतल्याचे उघडकीस आले. अक्षय अविवाहित होता. त्याचा विवाह ठरत नसल्याने तो नैराश्यात होता, अशी माहिती चौकशीत मिळाली आहे.
आत्महत्या करण्यापूर्वी मित्रांना संदेश
आत्महत्या करण्यापूर्वी अक्षय याने मित्रांना संदेश पाठविला होता. ‘आपली ही शेवटची भेट. पुढच्या जन्मी भेटू’, असा संदेश त्याने मित्रांना पाठविला होता. अक्षयने देशी बनावटीचे पिस्तूल कोणाकडून आणले, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
