पुणे : रात्रपाळीत झोपण्यावरुन झालेल्या वादातून सुरक्षारक्षकाचा गमजाने गळा आवळून खून करण्यात आल्याची घटना खराडी भागातील एका सोसायटीच्या आवारात घडली. या प्रकरणी एका सुरक्षा रक्षक तरुणाला खराडी पोलिसांनी अटक केली.

पांडुरंग भाऊराव हरवणे (वय ५२, रा. मांजरी बुद्रुक) असे खून झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. या प्रकरणी सुदर्शन माणिक काळे (वय २२, रा. तुळजाभवानीननगर, खराडी) याला अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पांडुरंग हरवणे आणि सुदर्शन काळे हे खराडीतील स्पॅनोलाईफ सोसायटीत सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. शनिवारी रात्रपाळीत हरवणे आणि काळे कामाला होते. काळे हा आठ ते नऊ महिन्यांपासून सोसायटीत काम करत आहे.

हरवणे यांनी काही महिन्यांपूर्वी नोकरी सोडली होती. त्यानंतर ते पुन्हा कामावर रूजू झाले होते. शनिवारी रात्रपाळीत दोघे जण होते. दोघांनी कामाची विभागणी केली. रात्री बारा ते सकाळी सहा या वेळेत नियोजन करुन तीन तास झोप घ्यायची, असे त्यांच्यात ठरले होते. झोपायला पहिले कोण जाणार या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला. काळे याने गळ्यातील गमजाने (डोक्याला गुंडाळण्याचे फडके) हरवणे यांचा गळा आवळला. हरवणे बेशुद्ध पडले. त्यानंतर घाबरलेल्या काळेने पोलीस नियंत्रण कक्षाला या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. बेशुद्धावस्थेतील हरवणे यांना रुग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गु्न्हा दाखल करुन काळे याला अटक केली.