पुणे : चाकण, तळेगाव, पिंपरी-चिंचवड या औदयोगिक क्षेत्रांमधील उद्योगांसाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. सूक्ष्म व लघुउद्योगांसह (एमएसएमई) नवउद्यमींना (स्टार्टअप) स्वत:चा उत्पादन प्रकल्प सुरू करण्यात अनेक समस्या येतात. त्यात जागेची समस्या ही सर्वांत मोठी ठरते. आता यावर उपाय म्हणून या उद्योगांसाठी बहुमजली उत्पादन संकुल उभारण्याचे पाऊल उचलण्यात आले आहे. पुण्यातील खेड तालुक्यात हे संकुल उभे राहणार असून, यामुळे जिल्ह्यातील औद्योगिक परिसंस्थेला बळ मिळणार आहे.

औद्योगिक क्षेत्रांमधील जागेच्या किमती गगनाला भिडल्या असून, तिथे जागा घेऊन उत्पादन सुविधा सुरू करणे छोट्या उद्योगांना शक्य नाही. यामुळे खेड तालुक्यात खराबवाडी येथे सूक्ष्म व लघुउद्योगासाठी बहुमजली उत्पादन संकुल उभारण्यात येणार आहे. चाकण, तळेगाव आणि पिंपरी-चिंचवड औद्योगिक क्षेत्रांपासून नजीकच्या अंतरावर असल्याने खराबवाडीची यासाठी निवड करण्यात आली आहे. या उत्पादन संकुलात उद्योगांसाठी वीज, पाणी, वाहतूक व्यवस्था आणि सामाईक सुविधा असतील. यामुळे सूक्ष्म व लघुउद्योग आणि नवउद्यमींना लवकरात लवकर उत्पादन सुरू करता येणार असल्याने सुरुवातीच्या टप्प्यातील भांडवलाचा बोजा कमी होण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पासाठी एकूण २८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

खराबवाडीत २ हजार ८०० चौरस मीटर जागेवर हे उत्पादन संकुल उभारण्यात येणार आहे. या संकुलाची उभारणी पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाकडून केली जाणार आहे. या संकुलासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळासह अग्निशमन दलाची परवानगी घेण्यात आली आहे. याचबरोबर या संकुलाचा आराखडा मंजुरीसाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे सादर करण्यात आला आहे. या संकुलामुळे वाहननिर्मिती, अभियांत्रिकीसह इतर संलग्न पुरवठा साखळीत सूक्ष्म व लघु उद्योगांचे योगदान वाढण्यास मदत होईल. यातून व्यवसायस्नेही वातावरणाला प्रोत्साहन मिळण्यासह गुंतवणूक आकर्षित होईल, असे सूत्रांनी सांगितले.

चाकण परिसरातील वाहननिर्मिती आणि अभियांत्रिकी परिसंस्थेत सूक्ष्म व लघुउद्योगांसाठी आवश्यक आणि योग्य अशी सुविधा उभारण्यात येणार आहे. या तयार सुविधेमध्ये उद्योगांना यंत्रे बसवून लगेचच उत्पादन सुरू करता येईल. वीज, पाणी आणि वाहतुकीच्या सुविधा या सामाईक असतील. यामुळे त्यांचा मोठा बोजा या उद्योगांवर पडणार नाही. स्वयंउद्योजक आणि नवउद्यमींसाठी हे चांगले पाऊल ठरणार असून, स्थानिक पुरवठा साखळीला यामुळे बळ मिळेल.- संदीप रोकडे, सहसंचालक, उद्योग विभाग

उत्पादन संकुलाची वैशिष्ट्ये

-१९ उद्योगांसाठी औद्योगिक पायाभूत सुविधा

  • स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती
  • प्रत्यक्ष रोजगार २४७ तर अप्रत्यक्ष रोजगार ३५०
  • एकूण ४२ कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित
  • भविष्यात उलाढाल १५० कोटी रुपयांवर