पुणे : अपघातानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याचा बहाणा करुन तरुणीच्या गळ्यातील सोनसाखळी चोरट्यांनी लांबविल्याची घटना खराडी परिसरात घडली. या प्रकरणी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत एका तरुणीने खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार २२ वर्षीय तरुणी वाघोलीतील केसनंद फाटा परिसरात राहायला आहे. मंगळवारी (५ मे) सकाळी नऊच्या सुमारास तक्रारदार तरुणी आणि तिची आई दुचाकीवरुन खराडी परिसरातून निघाल्या हाेती. खराडी परिसरात दुचाकी घसरल्याने दुचाकीस्वार तरुणी आणि तिच्या आईला दुखापत झाली. त्या वेळी तेथून निघालेल्या एका चोरट्याने तरुणी आणि तिच्या आईला मदत करण्याचा बहाणा केला. प्रथमोपचार करण्यासाठी खराडीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करतो, असे चोरट्याने सांगितले. चोरट्याने एक रिक्षा थांबविली. रिक्षाचालकाला एका खासगी रुग्णालयात रिक्षा नेण्यास सांगितले. चोरटा तरुणी आणि तिच्या आईसोबत रिक्षात होता. तरुणीचे लक्ष नसल्याची संधी साधून त्याने तिच्या गळ्यातील ३० हजारांची सोनसाखळी लांबविली.

तरुणी आणि तिच्या आईला रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांचे लक्ष नसल्याची संधी साधून चोरटा पसार झाला. या घटनेची माहिती तरुणीने पोलिसांना दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, पसार झालेल्या चोरट्याचा शोध घेण्यात येत आहे. हवालदार खरपुडे तपास करत आहेत.

पिंपरी-चिंचवडमधून टेम्पो चोरणारे अटकेत

टेम्पो चोरणाऱ्या चोरट्यांना गुन्हे शाखेच्या युनिट सहाने हडपसर परिसरातून अटक केली. चोरट्यांकडून टेम्पो, दोन मोबाइल संच असा चार लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

कन्हैयासिंग कालूसिंग टाक (वय ३३), राजेशसिंग नानकसिंग दुधाणी (वय ४८, दोघे रा. गाडीतळ, हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे. टाक आणि दुधाणी हे सराईत चोरटे आहेत. दोघांनी पिंपरी-चिंचवड परिसरातील चिखली भागातून टेम्पो चोरला होता. गुन्हे शाखेच्या युनिट सहामधील पोलीस कर्मचारी प्रशांत कर्णवर, नानासाहेब मोरे हे हडपसरमधील फुरसुंगी परिसरात गस्त घालत होते. त्या वेळी चिखली परिसरातून सराईत चोरटे टाक आणि दुधाणी यांनी टेम्पो चोरल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी टेम्पो चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून साडेचार लाख रुपयांचा टेम्पो, दोन मोबाइल संच जप्त करण्यात आला.

अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त विवेक मासाळ, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, तानाजी देशमुख, बाळासाहेब सकटे, प्रमोद टिळेकर, अमित कांबळे, पल्लवी माेेरे, मनीष लाेखंडे यांनी ही कारवाई केली.