पुणे : अन्न व औषध प्रशासनाने कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यात दोन कारवाया करून २४.८१ लाख रुपये किमतीचा बेकायदा औषधसाठा जप्त केला आहे. गेल्या काही दिवसांपासून अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने भेसळयुक्त खाद्य पदार्थ निर्मिती आणि प्रक्रिया उद्योगांवर धाडी टाकण्यात येत आहे याबरोबरच औषधांचे नमुनेही गोळा करण्यात येत आहे याचाच एक भाग म्हणून पुणे कोल्हापूरमध्ये कारवाई करण्यात आली.

कोल्हापूर येथील एका कंपनीवर अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकला. तपासादरम्यान मोठ्या प्रमाणात ॲलोपॅथिक औषधे, विशेषतः प्रतिजैविके, इंजेक्शन्सचा साठा आढळून आला. या औषधांच्या खरेदी-विक्रीसंदर्भातील आवश्यक परवाने व वैध कागदपत्रे सादर करण्यात संबंधित संस्था अपयशी ठरल्याने या प्रकरणी औषधांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. उर्वरित २९ प्रकारच्या औषधांचा १३.६ लाख रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे.

पुण्यात नामांकित औषध कंपनीवर कारवाई

दुसऱ्या कारवाईत पुणे जिल्ह्यातील वडकी येथील एका कंपनीच्या गोदामाची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान ‘रेक्टीन प्लस टॅब्लेट’ या शेड्युल एच अंतर्गत येणाऱ्या प्रीस्क्रिप्शन औषधाच्या पॅकेजिंगवर औषधाच्या वापराबाबत जाहिरात करण्यात आल्याचे आढळून आले. त्यामुळे संबंधित औषधाचा सुमारे ११.१९ लाख रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला.

आयुक्त, अन्न व औषध प्रशासनाचे आवाहन

  • औषधे केवळ अधिकृत व परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खरेदी करावीत.
  • औषध उत्पादक व विक्रेत्यांनी कायदे व नियमांचे काटेकोर पालन करावे.
  • संशयास्पद औषध विक्री अथवा बेकायदेशीर साठ्याची माहिती प्रशासनाला तात्काळ द्यावी.
    सार्वजनिक आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांना इशारा:
    राज्यात औषध उत्पादन, साठवण, वितरण व विक्री क्षेत्रातील कोणतीही बेकायदेशीर बाब खपवून घेतली जाणार नाही. जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरुद्ध कठोर आणि सातत्यपूर्ण कायदेशीर कारवाई पुढेही सुरू राहणार आहे.
  • तुकाराम मुंढे
    आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य