पुणे : प्रार्थनेतून कर्करोग, ट्यूमर असे असध्या आजार बरे करण्याचा दावा करणाऱ्या एका धर्मगुरुसह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. कोंढव्यातील एका प्रार्थनास्थळात ही घटना घडली. याबाबत एका महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, धर्मगुरुसह आठ जणांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ३२ वर्षीय महिला येरवडा भागात राहायला आहेत. त्या अंधश्रद्धा निर्मुलन चळवळीतील कार्यकर्त्या आहेत. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेले धर्मगुरु हे चिंचवड परिसरात राहायला आहेत. रविवारी (१४ जून) रोजी दुपारी तक्रारदार महिला आणि तिची मैत्रीण हे प्रार्थनास्थळात गेले. त्या वेळी तेथे उपस्थित असलेल्या स्वयंसेवकानंनी २० रुपये घेऊन महिलेला प्लास्टिकच्या बाटलीत पाणी दिले. ‘’कोणाताही आजार झाला असेल तर त्या भागावर हे पाणी लावा. त्यामुळे आजार कमी होईल’, असे कार्यकर्त्यांनी महिलेला सांगितले.
धर्मगुरुने प्रार्थना स्थळात सभा घेतली. त्या वेळी उपस्थितांना त्यांनी मार्गदर्शन केले. शरीराच्या ज्या भागात आजार आहे. त्या भागावर उजवा हात ठेवा. कर्करोग, ट्यूमरसर कोणताही विकार असू देत देव तुम्हाला बरे करणार आहे’, असे धर्मगुरुने उपस्थितांना सांगितले. त्या वेळी फिर्यादी महिला आणि तिच्याबरोबर असलेल्या मैत्रिणीने चित्रीकरण केले. त्या वेळी तेथ असलेल्या महिला स्वयंसेवकांनी त्यांना मोबाइलवर चित्रीकरण करण्यास मनाई केली. तक्रारदार महिला आणि तिच्याबरोबर असलेल्या मैत्रिणीला धक्काबुक्की करुन मोबाइलमधील चित्रफीत काढून (डिलिट) केली, असे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे.
जादुटोणा प्रतिबंधक कायदा, तसेच अन्य कायद्यातील कलमांन्वये धर्मगुरुसह आठ जणांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रशांत मंडले तपास करत आहेत.
