पुणे : रिक्षा वळविताना झालेल्या वादातून टोळक्याने रिक्षा चालकावर देशी बनावटीच्या पिस्तुलातून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना कोंढव्यात घडली. टोळक्याने रिक्षा चालकाला शस्त्राचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी चौघांना अटक केली.

या प्रकरणी कुणाल उर्फ नन्या जाधव, आदित्य घावरे, अक्षय ज्ञानेश्वर जावळे (वय २०, रा. जाधवनगर, वडगाव बुद्रुक, सिंहगड रस्ता), शिवाजी पांडुरंग मरगळे (वय २१, रा. शिवतेजनगर, कोल्हेवाडी, सिंहगड रस्ता) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याबरोबर असलेल्या तिघा साथीदारां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रिक्षा चालक इक्राहिम उर्फ अज्जू अहमद शेख (वय ४८, रा. अश्रफनगर, कोंढवा ) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षा चालक शेख हे ८ मार्च रोजी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास कोंढव्यातील काकडे वस्ती परिसरातून निघाले होते. पुणे महापालिकेच्या क्रीडांगणाजवळ शेख रिक्षा वळवित होते. त्या वेळी आरोपी जाधव, घावरे, जावळे आणि साथीदार दुचाकीवरुन निघाले होते. रिक्षा वळवत असताना दुचाकीस्वार आरोपी समोर आले. या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला.

आरोपींनी शेख यांच्याशी वाद घालून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. आरोपींनी त्यांच्याकडील असलेल्या देशी बनावटीच्या पिस्तुलातून गोळीबार केला. शेख यांना तीक्ष्ण शस्त्राचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली. घाबरलेल्या शेख यांनी कोंढवा पाेलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ पाचच्या पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, सहायक आयुक्त नम्रता देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी तातडीने तपास करुन पसार झालेल्या चौघा आरोपींना अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.

शहर परिसरात वाहन चालविताना झालेल्या किरकोळ वादातून हाणामारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दोन वर्षांपूर्वी टोळक्याने हडपसर भागात एका मोटार चालकावर किरकोळ वादातून कोयत्याने वार करुन खून केल्याची घटना घडली होती. पाषाण-बाणेर रस्त्यावर किरकोळ वादातून एका मोटार चालकाने दुचाकीस्वार तरुणीला मारहाण केल्याची घटना घडली होती. डेक्कन जिमखाना भागात एका दुचाकीस्वार दाम्पत्याला मारहाणीची घटना घडली होती. लष्कर भागातील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड भागात दुचाकी पुढे नेण्याच्या कारणावरुन दुचाकीस्वार मायलेकींना मारहाण करण्यात आल्याची घटना वर्षभरापूर्वी घडली होती. रस्त्यावर झालेल्या वादातून खून, खुनाचा प्रयत्न अशा प्रकारच्या घटना नित्याच्या झाल्या आहेत.