पुणे : कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहार प्रकरणात अमोडिया कंपनीचे भागधारक दिग्विजय पाटील यांच्याविरुद्ध पुणे पोलिसांकडून पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले.

कोरेगाव पार्क (मुंढवा) जमीन गैरव्यवहार प्रकरणात यापूर्वी शीतल तेजवानीविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. यापूर्वी दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात दिग्विजय पाटील यांच्या नावाचा उल्लेख नव्हता. तपासात मिळालेली माहिती, तसेच दस्तऐवजाची पाहणी केल्यानंतर या प्रकरणातील आरोपपत्रात पाटील यांचे नाव समाविष्ट करण्यात आले. या प्रकरणात पाटील यांना आरोपी करण्यात आले. शासकीय जमिनीची परस्पर खरेदी, व्यवहारातील अनियमितेतबाबात पाटील यांच्यावर आरोप ठेवण्यात आले आहेत. पाटील हे अमोडिया कंपनीचे भागधारक आहे.

 ते पार्थ पवार यांचे मामेभाऊ आहेत. या व्यवहाराशी संबधित दस्तऐवजांवर कंपनीच्या वतीने पाटील यांची स्वाक्षर असल्याचे तपासात उघडकीस आले. त्याआधारे पाटील यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले. या प्रकरणातील प्रमुख आरोपी शीतल तेजवानीला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. पाटील यांच्याविरुद्ध १८० पानांचे पुरवणी आरोपपत्र नुकतेच दाखल करण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली.