पुणे : विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात सध्या विकासकामांमुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. आता यात कोथरूडचीही भर पडणार असल्याचे चित्र आहे. कोथरूड परिसरात प्रस्तावित मेट्रो स्टेशन, बस डेपो आणि उड्डाणपुलामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या धास्तीने नागरिकांनी ‘सह्यांच्या मोहिम’च्या माध्यमातून एक अनोखे आंदोलन सुरू केले आहे. प्रशासनाने कामाचे नियोजन जाहीर केले नाही, तर रस्त्यावर उतरण्याचा इशाराही परिसरातील नागरिकांनी दिला आहे.

कोथरूड परिसरात प्रस्तावित मेट्रो स्थानक, बस डेपो आणि उड्डाणपुलामुळे आगामी काळात वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाचा त्रास होण्याच्या शक्यतेने परिसरातील नागरिकांकडून विकासकामांच्या काळातील पर्यायी उपाययोजना जाहीर करण्याची मागणी करण्यात आली.

या मागणीसह पौड रस्ता परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी कोथरूडकरांकडून सह्यांची मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती नागरिकांच्या वतीने राहुल चव्हाण यांनी दिली. नीलेश सैंदाणे, विशाल अट्टल, अमित बोत्रे, अनिल चौधरी, विनोद मावाणी, ज्योती किरण पाटील, मोनीश ठाकूर, पार्थ सोनवणे आदी समन्वय करणार आहेत.

मेट्रो स्थानक, बस डेपो आणि उड्डाणपुलाचे एकत्रित आणि शास्त्रीय वाहतूक नियोजन करावे, पौड रस्ता परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी उपाय जाहीर करावेत, विकासकामांमुळे होणाऱ्या परिणामांचा सविस्तर अहवाल सार्वजनिक करावा, त्यावर परिसरातील नागरिक, व्यापारी आणि तज्ज्ञांसमोर सादरीकरण करण्यात यावे, नागरिकांच्या सूचना आणि हरकती लेखी स्वरूपात स्वीकाराव्यात, अशा मागण्या कोथरूड परिसरातील नागरिकांनी केल्या आहेत. विकासकामांचे योग्य नियोजन जाहीर न झाल्यास आंदोलन करणार असल्याचा इशाराही नागरिकांनी दिला.

दरम्यान, आतापर्यंत सहाशेहून अधिक नागरिकांनी सह्या केल्या असून, कोथरूडच्या वेगळ्या भागात सह्यांची मोहीम राबवण्यात येत आहे. नागरिकांच्या मागणीबाबत महापालिकेचे आयुक्त आणि महामेट्रोच्या संचालक, अधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदन देण्यात आल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

कोथरुडकरांना नेमकी कशाची भीती ?

पौड रस्ता आणि परिसरात एकाच वेळी मेट्रो, बस डेपो आणि उड्डाणपुलाचे काम सुरू झाल्यास वाहतुकीचा मोठा खेळखंडोबा होण्याची शक्यता आहे. या विकासकामांच्या काळात नागरिकांनी नक्की कुठून प्रवास करायचा ? प्रदूषणाचे काय ? आणि व्यापारावर होणाऱ्या परिणामांचे काय? असे अनेक प्रश्न आता कोथरूडकर विचारत आहेत. विकासकामे हवीतच, मात्र ती करताना नागरिकांना वेठीस धरू नये, अशी साधी मागणी कोथरूडकरांनी केली आहे. पौड रस्त्यावरील वाढती गर्दी पाहता, नियोजनाशिवाय सुरू होणारे काम संपूर्ण परिसराला ‘ट्रॅफिक जाम’मध्ये अडकवू शकते, अशी भीती नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली.