पुणे : कोथरूड गोळीबार प्रकरणात गुंड नीलेश घायवळ टोळीतील नऊ सराइतांविरुद्ध गुन्हे शाखेने न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. ‘कोथरूडमध्ये घायवळ टोळीची दहशत कमी झाली आहे. शास्त्रीनगर भागात दहशत माजवा. गुन्हा दाखल झाल्यानंतर मी जामीन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करताो, तसेच गोळीबारासाठी पिस्तुले पुरवितो,’ अशा सूचना घायवळने साथीदारांना दिल्या होत्या, असे पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी ६ सप्टेंबर रोजी घायवळ टोळीतील सराइतांना कट रचला. त्यानंतर १७ सप्टेंबर रोजी सराइतांनी दहशत माजवून एका तरुणावर गोळीबार केल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे.

मयुर ऊर्फ राकेश गुलाब कुंबरे (वय २९, रा. सागर कॉलनी, शास्त्रीनगर,कोथरुड), मयंक मॉन्टी विजय व्यास (वय २९, रा. सागर कॉलनी, शास्त्रीनगर, कोथरुड), गणेश सतिश राऊत (वय ३२, रा. गावडे चाळ, संत ज्ञानेश्वर कॉलनी, कोथरुड), दिनेश राम फाटक (वय २८, रा. माथवड चाळ, संत ज्ञानेश्वर कॉलनी,आशिष गार्डन,कोथरुड), आनंद अनिल चांदलेकर (वय २४, रा. श्रीराम कॉलनी, शास्त्रीनगर, कोथरुड), मुसाब ईलाही शेख (वय ३३, रा. सिद्धीविनायक कॉलनी, कोथरुड), जयेश कृष्णा वाघ (वय ३६, रा. केळेवाडी, कोथरुड), अक्षय दिलीप गोगावले (वय २९, रा. बाराटे चाळ, सागर कॉलनी, शास्त्रीनगर, कोथरुड), अजय महादेव सरोदे (वय ३२, रा. योगीराज बिल्डिंग, वृंदावन कॉलनी, आझादनगर, कोथरुड) अशी आरोपपत्र दाखल केलेल्यांची नावे आहेत.

या प्रकरणात नीलेश घायवळसह साथीदारांविरुद्ध पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्याचे आदेश दिले होते. घायवळ सध्या परदेशात असून, त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी ‘रेड काॅर्नर’ नोटीस बजाविली आहे. घायवळच्या प्रत्यार्पणासाठी पुणे पोलिसांनी ब्रिटनमधील उच्चायुक्तांशी पत्रव्यवहार केला आहे.

कोथरुड येथील मुठेश्वर मित्र मंडळ चौकाजवळ १७ सप्टेंबर २०२५ रोजी काही जण गप्पा मारत थांबले होते. त्या वेळी घायवळ टोळीतील गुंडांनी मित्राबरोबर थांबलेल्या एका तरुणावर पिस्तुलातून गोळीबार केला. या परिसरात थांबलेल्या एका तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन दहशत माजविली होती. पोलिसांनी घायवळ टोळीतील सराइतांकडून एक पिस्तूल, पुंगळी, तसेच घायवळ याच्या घरातून काडतुसे, पुंगळ्या जप्त केल्या होत्या. घायवळ आणि त्याचा भाऊ सचिन यांच्याविरुद्ध ‘मकोका’ कारवाई करण्यात आली आहे. या गुन्ह्यात १२२ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली आहे. नऊ आरोपींविरुद्ध सहा हजार ४५५ पानी आरोपपत्र नुकतेच दाखल करण्यात आले.

अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप, सहायक पोलीस निरीक्षक राजेश माळेगावे, अमोल रसाळ, पोलीस उपनिरीक्षक राहुल पवार, विशाल चव्हाण, पोलीस कर्मचारी सुनील राऊत, संतोष डोळस, नितीन काळे, उत्तेकर यांनी ही कामगिरी केली आहे.