एके काळी शहराच्या मध्य भागात होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे शहराच्या विस्ताराबरोबर स्थलांतर होत आहे. कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कर्वेनगर परिसरातील पंडित फार्म्स, महालक्ष्मी लाॅन्स आणि वारजे भागातील काकडे फार्म्स येथे गेल्या काही वर्षांत सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये वाढ झाली असून, कोथरूड-कर्वेनगर आता पुण्यातील सांस्कृतिक कार्यक्रमांचे बेट होत आहे.

मध्यवर्ती भागांतील पेठांपुरत्या मर्यादित असलेल्या पुण्याचा १९६१ मध्ये आलेल्या पानशेत पुरानंतर चेहरामोहरा बदलला. छत्रपती संभाजी महाराज पुलापलीकडे कोथरूड-कर्वेनगर आणि पर्वतीच्या पलीकडे सहकारनगर, बिबवेवाडी, धनकवडी, कात्रज अशा भागांमध्ये नागरी वसाहती वाढू लागल्या. कोथरूडचा तर इतक्या झपाट्याने विकास झाला, की सर्वाधिक वेगाने विकसित झालेले उपनगर म्हणून गिनीज बुकमध्ये त्याची नोंद घेण्यात आली.

शहरातील गजबज आणि वाहतूक कोंडीपासून सुटका करून घेण्याबरोबरच काहीसा निवांतपणा अनुभवण्यासह जागेतील गुंतवणुकीचा उद्देश साध्य करण्यासाठी शनिवार पेठ, नारायण पेठ आणि सदाशिव पेठेतील अनेकांनी बंगला, सदनिका खरेदी करून कोथरूडमध्ये वास्तव्य सुरू केले. त्यांची सांस्कृतिक भूक भागविण्यासाठी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह साकारण्यात आले.

या नाट्यगृहामुळे तेथील नागरिकांना हक्काचे रंगमंदिर उपलब्ध झाले. सुजाण आणि सुसंस्कृत प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद मिळत असल्याने येथील नाट्यप्रसोग रंगतो, असा अनुभव बहुतांश कलाकारांना येतो. त्यामुळे बालगंधर्व रंगमंदिरानंतर सर्वाधिक मागणी कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाला असते.

नाट्यसंपदा प्रतिष्ठानाचा गानसरस्वती महोत्सव यांसह दिवाळी पहाट मैफली कर्वेनगर परिसरातील महालक्ष्मी लाॅन्स येथे, तसेच पंडित फार्म्स येथे आयोजित केल्या जातात. गेल्या काही वर्षांपासून डाॅ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानाचा ‘वसंतोत्सव’ वारजे येथील काकडे फार्म्स येथे भरविण्यात येत आहे. व्हायोलिन ॲकॅडमीच्या वतीने एमआयटी संस्थेच्या परिसरात ‘स्वरझंकार’ महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.

आर्थिकदृष्ट्या सधन आणि सांस्कृतिक उपक्रमांसाठी निधी राखून ठेवण्याची क्रयशक्ती असलेले रसिक अशा कार्यक्रमांना भरघोस प्रतिसाद देतात. त्यामुळेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणाऱ्या संस्थांचा हुरूप वाढण्यास रसिक आपल्या परीने योगदान देत आहेत. तर, सहकारनगर, बिबवेवाडी, धनकवडी, कात्रज परिसरातील नागरिकांसाठी पद्मावती परिसरात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृह कार्यरत आहे.

यशवंतराव चव्हाण नाट्यगृह साकारताच कोथरूड, वारजे, कर्वेनगर व परिसरातील दुर्लक्षित साहित्यिक-कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशातून दिलीप बराटे यांनी २००० मध्ये समविचारी मित्रांच्या मदतीने साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानची स्थापना केली. या प्रतिष्ठानाच्या माध्यमातून दर वर्षी डिसेंबरमध्ये साहित्यिक कलावंत संमेलनाचे आयोजन करण्यात येते.

या संमेलनाचे अध्यक्षपद भूषविलेले नारायण सुर्वे, डाॅ. तारा भवाळकर, डाॅ. सदानंद मोरे, उत्तम कांबळे, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, भारत सासणे आणि विश्वास पाटील या साहित्यिकांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याचा बहुमान मिळाला. कोथरूड-वारजे परिसरातील नागरिकांची सांस्कृतिक चळवळ झालेल्या उपक्रमाद्वारे यंदा रौप्यमहोत्सवी साहित्यिक कलावंत संमेलन शुक्रवारपासून (२७ मार्च) तीन दिवस भरविण्यात येत आहे.

पुणे महापालिकेची निवडणूक आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेची निवडणूक यामुळे दर वर्षी डिसेंबरमध्ये नाताळच्या सुमारास होणारे संमेलन यंदा मार्चअखेरीस होत आहे. संमेलनाचे रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे होत असताना प्रतिष्ठानचे अध्यक्ष व संमेलनाचे स्वागताध्यक्ष दिलीप बराटे यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. हे यंदाच्या संमेलनाचे वेगळेपण ठरले आहे.

पूर्वी गणेशोत्सवामध्ये चौकाचौकांत होणारे मेळे आणि व्याख्यानमालांसाठी पुणे ओळखले जात होते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या गणेश मंदिर वर्धापनदिनानिमित्त दर वर्षी गुढीपाडवा ते रामनवमी या कालावधीत होणारा संगीत महोत्सव हे पुणेकरांचे आकर्षण असायचे.

मात्र, वाहतूक वर्दळ वाढल्यानंतर रस्त्यावर कार्यक्रम घेता येणे शक्य नसल्याने गणेश कला क्रीडा मंच आणि गेल्या काही वर्षांपासून नूमवि प्रशाला येथे हा महोत्सव आयोजित करण्यात येतो. वाहने लावण्यासाठी शहराच्या मध्यवर्ती भागांत असलेली जागेची अनुपलब्धता ध्यानात घेता महत्त्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम कोथरूड-कर्वेनगर परिसरात स्थलांतरित झाले आहेत. परिणामी, हा परिसर पुण्याचे सांस्कृतिक बेट बनत आहे.
vidyadhar.kulkarni@expressindia.com