Pune Kothrud Real Estate infrastructure growth : काही वर्षांपूर्वी पुण्याच्या मध्यवर्ती पेठांतील लोकवस्ती वाढू लागली. यामुळे निवासासाठी नवीन पर्यायांचा शोध सुरू झाला. त्यातून पेठांतील पुणेकरांनी कोथरूडला पसंती दिली. आता पुणे महानगराचा विस्तार मुंबईच्या दिशेने सुरू असून, या नव्या पुण्याला जोडणारा दुवा कोथरूड ठरले आहे.
पानशेतच्या पुरानंतर खेडेगाव असलेल्या कोथरूडकडे पुणेकरांचे लक्ष वळाले. अनेकांनी तिथे जमिनी घेऊन घरे बांधली. मात्र, कोथरूडचा खऱ्या अर्थाने विस्तार नव्वदच्या दशकात सुरू झाला. त्या वेळी बंगले, मोकळ्या जागा आणि हिरवळ असे कोथरूडचे चित्र होते. आजच्या घडीला कोथरूड पाहिल्यास ते एक जागतिक दर्जाचे उपनगर बनले आहे. पुण्यातील आलिशान घरांचे प्रकल्प कोथरूडमध्ये साकारत आहेत. एकेकाळी मध्यमवर्गीयांचे केंद्र असलेले कोथरूड आयटीयन्सच्या वास्तव्याचे ठिकाण बनले आहे. त्यामुळे कोथरूडचे रूपडे पूर्णपणे पालटले. आता पुणे महानगराचा विस्तार मुंबईच्या दिशेने अधिक दिसून येत आहे. या भागाला जोडणारा दुवा कोथरूड बनले आहे. पुण्यातील आयटी हब असलेला हिंजवडी आणि बाणेर या परिसराशी कोथरूडची थेट जोडणी आहे. कोथरूडमधून पुण्याच्या मध्यवर्ती भागात येण्यास लागणारा वेळही तुलनेने कमी. त्यामुळे बाहेरून मुंबई-बंगळुरू महामार्गाशी थेटपणे संपर्क आणि पुण्याच्या मध्यवर्ती भागाशी नजीकता हा कोथरूडचा प्लस पॉइंट ठरत आहे.
कोथरूडमधील मालमत्ता क्षेत्राचा विस्तार होत असताना घरांच्या किमतीतही सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे खरेदीदारांना त्यांच्या गुंतवणुकीवर चांगला परतावाही मिळत आहे. कोथरूडमध्ये घरांचा सरासरी दर २०२१ मध्ये प्रतिचौरस फूट १० हजार ४५० रुपये होता. तो २०२५ च्या अखेरीस १३ हजार ६५० रुपयांवर पोहोचला. घरांच्या किमतीत पाच वर्षांत सुमारे ३० टक्के वाढ नोंदविण्यात आली. या परिसरातील घरांची विक्री आणि किमती यात स्थिर वाढ सुरू आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत कोथरूडमध्ये जागेची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे कोथरूडमध्ये पुनर्विकासाचे वारे शिरले आहे. जागेच्या टंचाईमुळे गगनचुंबी इमारती आता या परिसरात उभ्या राहू लागल्या आहेत. येथील जुन्या रहिवाशांना या प्रकल्पांमध्ये घरे मिळत असली, तरी नवीन ग्राहकांसाठी हे आलिशान गृहप्रकल्प महागडे ठरत आहेत.
पुण्यातील मेट्रोची सुरुवात कोथरूडमधून झाली, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. कारण शहरात सर्वप्रथम वनाज ते रामवाडी या मार्गिकेवर कोथरूडमध्ये मेट्रोची सेवा सुरू झाली. या मार्गावर एकूण १६ स्थानके आहेत. त्यातील वनाज, आनंदनगर, पौड फाटा आणि नळ स्टॉप ही स्थानके कोथरूड परिसरात आहेत. आता वनाज ते चांदणी चौक असा मेट्रोचा विस्तार सुरू असून, थेट मुंबई-बंगळूर महामार्गावरील चांदणी चौकात जाणे शक्य होणार आहे. याच वेळी नळ स्टॉप ते माणिकबाग असा मेट्रो मार्ग प्रस्तावित असून, त्यामुळे या परिसराचा वेगाने विस्तार होणार आहे. गेल्या काही वर्षांपासून मेट्रो मार्गावर घरांना मागणी वाढल्याचे चित्र पुणे महानगरात दिसून येत आहे. कोथरूडही त्याला अपवाद नाही. घरातून मेट्रो स्थानकांपर्यंत चालत पोहोचणेही शक्य होत असल्याने या मार्गावरील घरांना पसंती मिळत आहे.
कोथरूडमधील मालमत्ता क्षेत्र
वर्ष – घरांच्या सरासरी किमती (प्रति चौरस फूट)
२०२१ – १० हजार ४५० रुपये
२०२२ – ११ हजार ७५० रुपये
२०२३ – १२ हजार ९५० रुपये
२०२४ – १३ हजार १०० रुपये
२०२५ – १३ हजार ६५० रुपये
(स्रोत : ९९ एकर्स डॉट कॉम)
sanjay.jadhav@expressindia.com
