पुणे : ‘कोथरूड येथील ‘ॲव्हेन्यू सिटीप्राईड’जवळील ४६७ झाडे तोडण्याच्या निर्णयाला महापालिकेने स्थगिती दिली आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी हा निर्णय घेतला. झाडे तोडण्याला नागरिकांनी तीव्र विरोध केला होता. झाडे तोडण्यास स्थगितीचा निर्णय देताना तोडलेल्या झाडांच्या पुनर्रोपणासाठी महापालिकेकडे जागा उपलब्ध नसल्याचे कारण देण्यात आले आहे.
कोथरूड येथील सर्व्हे नंबर १२/२, १२ /५ मधील रस्त्याचे रुंदीकरण केले जाणार आहे. पुणे महापालिकेच्या विकास आराखड्यामध्ये (डीपी) हा रस्ता २० मीटर रुंदीचा दाखविण्यात आला आहे. हा रस्ता रुंद करण्यासाठी या भागातील सुमारे ४६७ झाडांचा अडथळा ठरत आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने याचे सर्वेक्षण केले.
यातील १४९ झाडे पूर्णपणे काढून उर्वरित ३१८ झाडांचे पुनरोर्पण करण्याचा ठराव महापालिकेच्या पथ विभागाने वृक्ष प्राधिकरण समितीकडून तीन वर्षांपूर्वी मान्य करून घेतला. सप्टेंबर २०२३ मध्ये ही झाडे तोडण्यासाठी मान्यता देण्यात आली. मात्र, त्यानंतर महापालिकेने यावर कोणतीही कार्यवाही केली नाही.
गेल्या महिन्यात या भागातील ५० पेक्षा अधिक झाडे महापालिकेने रस्ता रुंदीकरणासाठी तोडली. एवढ्या मोठ्या प्रमाणात या भागातील झाडांची कत्तल होणार असल्याचे लक्षात आल्यानंतर स्थानिक नागरिकांनी याला विरोध केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्याचे सरचिटणीस हेमंत संभूस यांनी विरोध करून आंदोलनाचा इशारा दिला.
संभूस म्हणाले, ‘या भागात महापालिकेने २० मीटर रुंदीचा रस्ता करण्याचा घाट घातला आहे. या रस्त्यासाठी झाडे तोडली जाणार असल्याने येथील हरित भाग संपुष्टात येणार आहे. या रस्त्याचा कोथरूडकरांना कोणताही उपयोग नाही. ठराविक व्यक्तींना फायदा व्हावा, यासाठी हे उद्योग सुरू आहेत.’
महापालिकेच्या विकास आराखड्यात मृत्युंजयेश्वर मंदिराजवळील ओढ्यापासून सौरभ हॉलपर्यंत ३० मीटर रुंदीचा रस्ता प्रस्तावित आहे. सुमारे तीन वर्षांपूर्वी संबंधित जागामालकाने ‘एफएसआय’च्या मोबदल्यात २० मीटर रुंदीच्या रस्त्यासाठी ही जागा महापालिकेकडे हस्तांतरित केली.
रस्त्याच्या रुंदीकरणाला अडथळा ठरणारी ४६७ झाडे तोडली जाणार आहेत. त्याच्या बदल्यात सुमारे ६५०० झाडे लावली जाणार असल्याचा दावा महापालिकेच्या पथ विभागाकडून केला जात आहे. ही झा़डे तोडल्याने कोथरूडमधील हिरवागार परिसर कायमचा नाहीसा होणार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
ही ४६७ झाडांच्या पुनर्रोपणासाठी महापालिका प्रशासनाकडे जागा उपलब्ध नाही. जागा नसतानाही महापालिकेने झा़डे तोडण्यास सुरुवात केल्याने नागरिकांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर झाडे तोडण्यास स्थगिती देण्यात आली. महापालिकेच्या पथ विभागाचे मुख्य अभियंता राजेश बनकर म्हणाले, ‘या भागातील झाडे तोडून त्याच्या बदल्यात सुमारे ६५०० झाडे महापालिकेकडून लावली जाणार आहेत. यासाठी लुल्लानगर येथे वन विभागाची जागा मिळणार आहे. महापालिकेकडे सध्या जागा उपलब्ध नसल्याने कोथरूड येथे रस्ता रुंद करण्यासाठी सुरू केलेली वृक्षतोड स्थगित केली आहे.’
