पुणे : शहर आणि हवेली तालुक्यात होत असलेल्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर भूमी अभिलेख विभागाचा ताण कमी करण्यासाठी महसूल विभागाने शहर नगर भूमापन आणि हवेली भूमी अभिलेख कार्यालयाची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शहरासाठी नव्याने दोन नवीन नगर भूमापन कार्यालये स्थापन होणार असून, शहरात एकूण चार नगर भूमापन कार्यालये कार्यरत असणार आहेत.
पुणे शहर, उपनगर आणि शहरालगतच्या गावांचा विस्तार झपाट्याने होत आहे. त्यामुळे गृहप्रकल्प, जमिनींचे खरेदी-विक्री व्यवहार आणि रस्ते-पायाभूत सुविधांच्या कामांना मोठ्या प्रमाणावर गती मिळाली आहे. मात्र, मर्यादित मनुष्यबळ आणि विस्तीर्ण कार्यक्षेत्रामुळे भूमी अभिलेख विभागाकडे मोजणीचे अर्ज प्रलंबित राहत आहेत. ही बाब विचारात घेऊन महसूल विभागाने प्रशासकीय फेरबदल केला आहे. त्यानुसार नगर भूमापन अधिकारी क्रमांक ३ आणि नगर भूमापन अधिकारी क्रमांक ४ अशी दोन नवीन कार्यालयांची निर्मिती करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
दरम्यान, या पुनर्रचनेमुळे एका कार्यालयावर येणारा हजारो मिळकतींचा ताण कमी होईल. कामाची गुणवत्ता सुधारण्याबरोबरच मालमत्ता पत्रिका (प्राॅपर्टी कार्ड) सुलभपणे मिळेल, तसेच नागरिकांना मिळकतींची मालमत्ता पत्रिका करून घेणे, त्यामध्ये नाव नोंदविणे, तसेच दुरुस्ती करण्याची कामे वेगाने होतील, असा दावा महसूल विभागाकडून करण्यात आला आहे.
कार्यालयाचे नाव – सुधारित कार्यक्षेत्र
- नगर भूमापन क्रमांक १ : या कार्यालयाच्या हद्दीत आता ३३,००८ मिळकती असतील. त्यांचे कार्यक्षेत्र शनिवार पेठ, मुळा रोड, कर्वेनगर, एरंडवणे, भांबुर्डा, पाषाण, औंध, बोपोडी, हिंगणे खुर्द, धनकवडी, कोथरुड असे राहील.
- नगर भूमापन क्रमांक २ : या कार्यालयाच्या हद्दीतील मिळकतींची संख्या ४०,१०० एवढी असेल. त्यांचे कार्यक्षेत्र गणेश पेठ, महात्मा फुले पेठ, घोरपडे पेठ, गुरुवार पेठ, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, रविवार पेठ, कसबा पेठ, नाना पेठ, भवानी पेठ, शुक्रवार पेठ, कात्रज, कोंढवे खुर्द, वानवडी, हडपसर, मुंढवा, घोरपडी, येरवडा, कळस, धानोरी, लोहगाव असे असेल.
- नगर भूमापन क्रमांक ३ : या कार्यालयाच्या हद्दीतील एकूण मिळकती ६५,२३७ इतक्या असतील. कार्यक्षेत्र बाणेर, बालेवाडी, बावधन बुद्रुक, बावधन खुर्द, वारजे, शिवणे, नांदेड, वडगाव खुर्द, वडगाव बुद्रुक, आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द, नऱ्हे, धायरी, किरकटवाडी, मांगडेवाडी, निंबाळकरवाडी, येवलेवाडी, कोंढवे बुद्रुक, पिसोळी, उंड्री, महंमदवाडी असे असेल.
- नगर भूमापन क्रमांक ४ : या कार्यालयाच्या हद्दीतील एकूण मिळकती ८०,६९३ एवढ्या असतील. त्यांचे कार्यक्षेत्र बोपखेल, दिघी, चऱ्होली बुद्रुक, डुडुळगाव, निरगुडी, वडगाव शिंदे, वाघोली, खराडी, वडगाव शेरी, मांजरी खुर्द, मांजरी बुद्रुक, शेवाळवाडी, फुरसुंगी, वडकी, उरुळी देवाची, होळकरवाडी, वडाचीवाडी, औताडे हांडेवाडी, वडमुखवाडी, चोविसावाडी असे आहे.
