पुणेः सण-उत्सवांतील ‘डीजे’च्या वापरावरून गदारोळ सुरू असताना उत्सवकाळात वापरल्या जाणाऱ्या डोळे दिपवणाऱ्या ‘लेझर लाईट’मुळे नागरिकांच्या दृष्टीचे कायमचे नुकसान होऊ शकते, प्रसंगी दृष्टीही जाऊ शकते, असा स्पष्ट इशारा नेत्रतज्ज्ञांनी दिला आहे. या धोक्याचे गांभीर्य ओळखून जिल्हा प्रशासनाने यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला असला, तरी त्याची प्रत्यक्षात काटेकोर अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा वैद्यकीय क्षेत्रासह सर्व स्तरांतील नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.

सण, उत्सव आणि सार्वजनिक मिरवणुकांमध्ये डिझाइन आणि शोभेसाठी वापरले जाणारे लेझर दिवे अत्यंत तीव्र आणि आकर्षित करणारे किरण सोडून उजेडाचे पट्टे तयार करतात. गणेशोत्सव, दहीहंडी, नवरात्र अशा विविध उत्सवांमध्ये मंडप, देखावे आणि मिरवणुकीच्या मार्गांवर वेगवेगळ्या रंगांचे, वेगाने फिरणारे आणि लांबपर्यंत जाणारे लेझरचे झोत फेकले जातात. हे तीव्र प्रकाशाचे पट्टे हवेत आणि गर्दीवर सातत्याने फिरत असल्यामुळे संपूर्ण परिसराला एक चकचकीत आणि रंगीबेरंगी लखलखाट मिळतो. ‘डीजे’ आणि संगीताच्या तालावर चालणारे हे रंगीबेरंगी लेझरचे किरण उत्सवाचे वातावरण अधिक भव्य आणि झगमगीत करण्यासाठी वापरले जातात. काही ठिकाणी ‘थ्री-डी इफेक्ट्स’ने आकाशात विविध आकृत्या केल्या जातात. मात्र, डोळ्यांच्या टप्प्यांत याचा प्रकाश आल्यास डोळ्यांना मोठ्या प्रमाणावर इजा होऊ शकत असल्याचे वैद्यकीय तज्ञ सांगतात.

‘लेझर’चे गंभीर परिणाम

वैद्यकीय तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘लेझर’ची तीव्र किरणे थेट डोळ्यात पडल्यास डोळ्याच्या मागील दृष्टिपटल जळतो. यामुळे दृष्टी कायमस्वरुपी धुसर होऊ शकते किंवा पूर्णपणे अंधत्व येऊ शकते. ‘लेझर’च्या उष्णतेमुळे डोळ्यातील पेशी अत्यंत कमी वेळेत नष्ट होतात. त्यामुळे डोळ्यांची जळजळ, पाणी येणे आणि अचानक अंधारी येणे असा त्रास होतो. ‘लेझर’चे किरण मोबाईल किंवा कॅमेऱ्याच्या लेन्सवर पडल्यास कॅमेऱ्याचे सेन्सर पूर्णपणे खराब होतात. अत्यंत उच्च क्षमतेचे लेझरचे किरण थेट त्वचेवर बराच वेळ पडल्यास त्वचेला जळजळ किंवा लालसरपणा येऊ शकतो.

‘लेझर’पासून असा बचाव करा

  • थेट नजरेचा संपर्क टाळा
  • ‘लेझर’ किरणे जिथून येत आहेत त्या दिशेला थेट पाहणे टाळा.
  • किरणे आपल्या चेहऱ्याच्या किंवा डोळ्यांच्या दिशेने येत असल्याचे दिसताच त्वरित डोळे मिटा किंवा चेहरा दुसरीकडे फिरवा.
  • ‘लेझर शो’ किंवा मोठ्या मिरवणुकांमध्ये सहभागी होताना विशिष्ट दर्जाचा प्रोटेक्टिव्ह किंवा गॉगल चष्मा वापरा.
  • ‘लेझर’च्या स्रोतापासून शक्य तितके लांब उभे राहा.
  • लहान मुलांचे डोळे अधिक नाजूक असतात. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी मुलांना थेट त्या किरणांसमोर उभे राहू देऊ नका.
  • ‘लेझर’ची किरणे डोळ्यात पडल्यानंतर अंधारी आल्यास, डोळे दुखल्यास किंवा धुरकट दिसू लागल्यास घरगुती उपाय न करता त्वरित नेत्रतज्ज्ञांकडे जा.

‘लेझर’च्या तीव्र किरणांमुळे डोळ्यांना होणाऱ्या समस्या (तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार)

  • डोळ्यांच्या मध्यवर्ती दृष्टीसाठी महत्त्वाचा असलेला ‘मॅक्युलार’ हा भाग ‘लेझर’च्या उष्णतेमुळे भाजला जातो. यामुळे वस्तूच्या मध्य भागातील दृश्य धुरकट दिसते किंवा पूर्णपणे काळे दिसते.
  • ‘लेझर’च्या उच्च ऊर्जेमुळे दृष्टिपटलातील अत्यंत नाजूक रक्तवाहिन्या फुटतात. त्यामुळे डोळ्यात अंतर्गत रक्तस्त्राव होतो आणि अचानक दिसेनासे होऊ शकते.
  • कॅमेऱ्याचा अचानक फ्लॅश पडल्यावर काही सेकंद किंवा मिनिटे आपल्याला काहीच दिसत नाही, तसाच प्रकार लेझरमुळे होतो. हा तात्पुरता अंधार असतो, परंतु वाहन चालवताना किंवा गर्दीत असा त्रास झाल्यास मोठा अपघात होऊ शकतो.
  • डोळ्याच्या बाहेरील पारदर्शक थराला ‘लेझर’च्या उष्णतेमुळे इजा पोहोचते. यामुळे डोळ्यात तीव्र वेदना होणे, डोळे लाल होणे, सतत पाणी येणे आणि प्रकाश न सहन होणे या समस्या होतात.
  • अति-तीव्र प्रकाशामुळे डोळ्यांतील पेशी रासायनिकदृष्ट्या पेशी नष्ट होतात. या आजारात वस्तूंचे आकार वेडेवाकडे दिसणे किंवा धुरकट दिसणे असा त्रास होतो.
  • ‘लेझर’ची किरणे तीव्र असतील, तर अगदी काही सेकंद जरी ती थेट डोळ्यांच्या मध्यभागी पडली, तर डोळ्यांतील पेशी पूर्णपणे मृत होऊन कायमचे अंधत्व येऊ शकते.

जाणकारांचे म्हणणे काय?

साईनाथ गणेश मित्र मंडळाचे पियुष शहा यांनी शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले त्यांनी सांगितले की, ज्या गोष्टीचा नागरिकांना त्रास होतो, अशा गोष्टी सण उत्सवांतून हद्दपार व्हायला हव्यात. लेझर हे त्यापैकीच एक आहे. गणेश मंडळांचा याला पूर्वीपासूनच विरोध असून, जिल्हाधिकाऱ्यांनीच योग्य निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे स्वागतच करण्यात येत आहे.

नेत्ररोगतज्ज्ञ डॉक्टर संजय पाटील आणि डॉक्टर राधिका परांजपे यांनी याविषयीअधिक माहिती दिली. या लेझरमुळे डोळ्यांना काही दुखापत झाली, तर ती भरून निघणारी नसते. गेल्या वर्षी असे काही रुग्ण उपचारांसाठी आले होते, की त्यांचे डोळे दुर्दैवाने वाचवता आले नाहीत. याशिवाय, दृष्टी कमी होणे, कायमचे अंधत्व येणे यासारखे दुष्परिणाही होऊ शकतात. हा प्रकाश इतका घातक आहे की, १० ते १५ सेकंद याचा उजेड डोळ्यात गेला तरी पडद्याचा मागील भाग जळु शकतो. त्यामुळे बंदी घालण्याचा निर्णय योग्य असून, याची काटेकोर अंमलबजावणी व्हायला हवी.

लेझर बंदीचा निर्णय स्वागतार्ह आहे. यामुळे डोळ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर इजा होऊ शकते. बऱ्याचदा ही हानी न भरुन निघणारी आहे. लेझरमुळे डोळ्यांच्या मागच्या पडद्यावर थेट परिणाम होऊ शकतो. तरुण वर्गाला या लेझरची भुरळ असून, यांच्या डोळ्यांना इजा झाल्याच्या घटनाही नोंदवल्या गेल्या आहेत.

पूना इलेक्ट्रिक अँड इलेक्ट्रॉनिक असोसिएशनचे अध्यक्ष रोहित यावतकर यांनीही जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले ते म्हणाले की, लेझर लाइटचा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय आमच्यापर्यंत आला असून, आम्ही आमच्या संघटनेत याविषयी सूचना जारी करणार आहोत. लेझरचे दिवे विकू नयेत, अशा सूचना करणार आहोत. वास्तविक, डोळ्यांना इजा करणारे लेझर दिवे आपल्याकडे सरसकट विकले जात नाहीत. पुण्यात जवळपास ८०० लहान-मोठे विक्रेते आहेत. मात्र, अशा घातक लेझर दिव्यांची सर्रास विक्री होत नाही.