पुणे : रस्त्यात मोटार थांबविल्यानंतर दरवाजा अचानक उघडल्याने दरवाज्यावर आदळून दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना लष्कर भागात घडली. अपघातास जबाबदार ठरल्या प्रकरणी लष्कर पोलिसांनी मोटार चालक महिलेविरुद्ध गु्न्हा दाखल केला.

सूर्यकांत लक्ष्मण बिडकर (वय ४२, रा. गवळी वाडा, बुटी स्ट्रीट, लष्कर) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. या प्रकरणी मोटार चालक महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी ३० वर्षीय महिला लष्कर भागातील साचापीर स्ट्रीट परिसरात राहायला आहे. याबाबत यश गणेश चवंडके (वय २५, रा. गवळी वाडा, बुटी स्ट्रीट, लष्कर ) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार बिडकर हे ३० जुलै रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास बुटी स्ट्रीट परिसरातून निघाले होते.

क्वार्टर गेटकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोटार चालक महिलेने मोटार थांबविली. तिने अचानक दरवाजा उघडला. मोटारीचा दरवाजा अचानक उघडल्यानंतर दुचाकीस्वार बिडकर हे दरवाज्यावर आदळले. त्यांच्या डोक्याला, तसेच डोळ्याला गंभीर दुखापत झाली. गंभीर जखमी झालेल्या बिडकर यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांच्या मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. पोलीस हवालदार साबळे तपास करत आहेत.

बिडकर हे गवळी वाडा परिसरात राहायला होते. लष्कर भागातील विविध सामाजिक उपक्रमात त्यांचा सहभाग असायचा. बिडकर यांचा अपघाती मृत्यू झाल्याचे समजताच नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. येरवडा भागातील गोल्फ क्लब रस्त्यावर वर्षभरापूर्वी मोटारीचा दरवाजा अचानक उघडल्यानंतर दरवाज्यावर आदळून एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.