लक्ष्मी रस्ता हा पुण्याचे वैभव. पुण्याबद्दल कुतूहल असणाऱ्या प्रत्येकालाच हा रस्ता माहीत असतो. चप्पल, कापड आणि दागिन्यांची बाजारपेठ. जुने वाडे नि ऐतिहासिक ठिकाणे. रस्त्यांवरून फक्त गाड्या-माणसांची ये-जा होत नसते. तिथल्या माणसांचे रोजचे जगणे आणि त्या जगण्यातून निर्माण होणारी संस्कृती, लोकव्यवहार त्या-त्या रस्त्यांवर उमटत असतात. वेगळी छाप पाडणारे काही रस्ते संपूर्ण शहराची ओळख म्हणून समोर येतात.

काल-परवापर्यंत लक्ष्मी रस्ता ही पुण्याची ओळख. आता शहर विस्तारले आहे. मध्यवर्ती पेठांबरोबरच उपनगरेही गर्दीने गजबजून गेली आहेत. पण, आजही लक्ष्मी रस्ता हे पुण्याचे वैभव. पुण्याच्या पूर्व आणि पश्चिम भागातील मध्यवर्ती पेठा जोडण्यासाठी १९२०-२१ मध्ये इंग्रजांनी हा रस्ता बांधला. त्यांनी या रस्त्याला ईस्ट-वेस्ट रोड हे नाव दिले. त्याहीआधी पेशव्यांच्या काळात या रस्त्यावर बाजारपेठ विकसित होत होती. त्या काळापासून या रस्त्यावर असलेली काही दुकाने, दालने आताही नजरेस पडतात. स्वातंत्र्यानंतर कपडे-साड्या, चपला, सौंदर्य प्रसाधने आणि दागिन्यांची बाजारपेठ म्हणून हा रस्ता ओळखला जाऊ लागला.

कालांतराने इंग्रजांनी दिलेले नाव मागे पडले. पुणेकरांच्या आवडीचा हा रस्ता इथल्या बाजारपेठेतील कोट्यवधी रुपयांच्या उलाढालीमुळे लक्ष्मी रस्ता म्हणून ओळखला जाऊ लागला. टिळक चौकातून लक्ष्मी रस्त्यावर जुन्या विजय टॉकीजच्या दिशेने चालायला सुरुवात केली, की दोन्ही बाजूंना ओळीने कपड्याची, दागिन्यांची जुनी-नवी दालने. कोणत्याही शहरातील बदल त्या बाजारपेठेत पहिल्यांदा दिसू लागतात. आता काही पिढ्यांपासून सुरू असलेल्या पारंपारिक दालनांच्या जोडीने देश-विदेशातील ब्रँड लक्ष्मी रस्त्यावर दिसतात. टीव्ही, वृत्तपत्रांतल्या जाहिरातींमध्ये दिसणारे सगळे चेहरे लक्ष्मी रस्त्यावर लक्ष वेधून घेतात. अनेक छोटी-छोटी दुकानेही या स्पर्धेत मागे राहत नाहीत. रस्त्यावरचा पदपथ व्यापून गिऱ्हाईक मिळविणाऱ्यांची गर्दीही कमी नाही. या सगळ्या गर्दी-गोंधळात लक्ष्मी रस्त्यावर चालण्यासाठी पदपथ नि वाहनांसाठी वाट शोधावी लागते. पार्किंगला जागा मिळण्यासाठी तर नशिबवान असावे लागते.

दुकाने-दालनांबरोबर लक्ष्मी रस्त्यावर ठिकठिकाणी इतिहासाच्या पाऊलखुणा सापडतात. बेलबाग चौकात आतल्या बाजूला २५० वर्षांहून अधिक जुने बेलबाग विष्णू मंदिर आहे. अनंत चतुर्दशीला मानाचे पाचही गणपती बेलबाग चौकातून लक्ष्मी रस्त्यावर प्रवेश करतात. ढोल-ताशांचा गजर आणि गुलालाची उधळण करून गणरायाची मिरवणूक निघते. सणासुदीच्या प्रत्येक दिवशी लक्ष्मी रस्ता उजळून निघतो. सिटी पोस्ट, नगर वाचन मंदिर, तुळशीबाग, सेवासदन आदी लक्ष्मी रस्त्याचे महत्त्व वाढवणारी ठिकाणे. पण, शासनाच्या यंत्रणांसाठी इतिहास, वारसा म्हणजे मोठे ओझेच. यादीत एक नाव वाढले, की जबाबदारी कोण घेणार? ऐतिहासिक वारसा असूनही कित्येक वर्षे सिटी पोस्टाची सुंदर दगडी इमारत महापालिकेच्या वारसास्थळांच्या यादीत नव्हतीच. शेवटी, दोन-चार वर्षांपूर्वी पुनर्विकासाचा प्रश्न निघाला नि सिटी पोस्ट वारसा स्थळांच्या यादीत आले. स्त्रियांना रोजगारयोग्य शिक्षण मिळावे म्हणून त्या काळात पंडिता रमाबाईंनी सेवासदनची स्थापना केली. देशातील पहिली नर्स याच सेवासदनमधून शिकली. मात्र, रमाबाई कोण होत्या, हे सांगायलाही आता कोणाकडे फुरसत नाही.

लक्ष्मी रस्त्यावरचे जुने वाडे आता पुनर्विकासात निघालेत. एक-दोन मजली दालनांच्या बाहेर ‘रिडेव्हलपमेंट कमिंग सून’चे बोर्ड लागलेले दिसतात. पुणेकरांच्या आवडीचे विजय टॉकीजची इमारत पडून आता ‘प्रॉफिटबे’ मॉल उभा राहत आहे. त्या समोरचा पदपथ ओळीने पावसाळी जॅकेट, कपड्यांनी व्यापून टाकलेला दिसतो. काही अंतरावर बेडेकर मिसळ आणि ‘हर्षवर्धन’मध्ये सोडा-ज्यूस. आता खाउगल्लीतले ठेले नि त्या समोरची गर्दीही वाढलेली दिसते.

या बदलांबद्दल सराफ असोसिएशनचे अध्यक्ष फत्तेचंद रांका सांगतात, ‘सुरुवातीला शगुन चौकापासून जुन्या विजय टॉकीजपर्यंत या रस्त्यावर काहीच नव्हते. आम्ही काही सराफांनी इथे व्यवसाय उभा केला. नंतरच्या काळात खास कपड्यांसाठी ओळखला जाणारा लक्ष्मी रस्ता दागिन्यांसाठीही ओळखला जाऊ लागला. गेल्या काही वर्षांत पारंपरिक दालनांबरोबर अनेक नवीन दालनेही या रस्त्यावर सुरू झाली. व्यापार वाढला. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी लक्ष्मी रस्त्याच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात राहतात. परिसरातील गर्दीही वाढली. पूर्वी या रस्त्यावर गणू शिंदेंचे एकच हॉटेल होते. आता आजूबाजूच्या गल्ल्यांमध्ये नाश्त्याच्या गाड्यांवर आणि खाऊगल्ल्यांमध्ये गर्दी दिसते. त्यात पदपथांवरच्या अतिक्रमणामुळे रस्ता काहीसा विद्रूप झाला आहे. चालायला, गाडी लावायला जागा उरली नाही. आता पार्किंगचा प्रश्न सोडवण्यासाठी ‘पे अँड पार्क’ सुरू करण्याची मागणी महापालिकेकडे केली आहे. सणासुदीला नदीपात्रात गाड्या लावून पुणेकर खरेदीला लक्ष्मी रस्त्यावर येतात. लक्ष्मी रस्त्यावरच्या उत्साही वातावरणामुळे चालणे कंटाळवाणे होत नाही. त्यामुळे लक्ष्मी रस्ता आपले वैभव टिकवून आहे.’

लक्ष्मी रस्त्याच्या आजूबाजूला राहणारे रहिवाशी आता नव्याने वसलेल्या पेठा, उपनगरांमध्ये स्थलांतरित झालेत. पण, दालने मोठी होतायेत, रस्त्यावरची वर्दळही वाढली आहे. लक्ष्मी रस्ता ‘अनुभवता’ यावा, म्हणून ‘वॉकिंग प्लाझा’सारखे पर्याय शोधले गेले आहेत. पण, पायाभूत सुविधांची वानवा पूर्णपणे संपलेली नाही. हा रस्ता हे शहराचे वैभव असेल, तर ही श्रीमंती वारसासंपन्न असायला हवी, नुसती झगमगाटी नाही.

(क्रमश:)

tushar.suryawanshi@expressindia.com