पुणे : पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीत ‘घोडेबाजार’ होऊ नये, यासाठी पक्षाने उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे उमेदवार श्रीकांत पाटील यांनी स्पष्ट केल्यावर, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे उमेदवार विक्रम काकडे यांनी ‘घोडेबाजारा’चा प्रश्न नव्हता, ९५ टक्के मतदार महायुतीचे होते,’ असे वक्तव्य केल्याने ‘घोडेबाजारा’ची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू राहिली. उमेदवारी मागे घेण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि काँग्रेस या महाविकास आघाडीत विसंवाद झाल्याचेही दिसून आले.

या मतदारसंघातील इतर सर्व उमेदवारांनी माघार घेतल्याने महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे उमेदवार विक्रम काकडे यांची बिनविरोध निवड होण्यावर शिक्कामोर्तब झाले. काकडे यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे शहराध्यक्ष श्रीकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी संंवाद साधल्यानंतर आणि माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर श्रीकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला.

त्यानंतर पाटील यांनी उमेदवारी का मागे घेतली, याचे स्पष्टीकरण दिले. ‘या निवडणुकीत कोणत्याही प्रकारचा घोडेबाजार होऊ नये, लोकशाही मूल्यांचे रक्षण व्हावे आणि निवडणूक प्रक्रियेचे पावित्र्य अबाधित राहावे, या व्यापक भूमिकेतून पक्षाने निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विनंतीला मान देत आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या आदेशानुसार या निवडणुकीतून माघार घेतली आहे. लोकशाही प्रक्रियेवर आमचा पूर्ण विश्वास असून, राजकारणात मूल्याधिष्ठित भूमिका कायम ठेवण्याचा पक्षाचा प्रयत्न राहील,’ असे पाटील यांनी स्पष्ट केले.

यावर विक्रम काकडे म्हणाले, ‘घोडेबाजाराचा प्रश्नच नव्हता. ९५ टक्के मतदार महायुतीचे होते. आता महायुतीच्या मतदारांना प्रत्यक्ष जाऊन भेटणार आहे. त्यांचे प्रश्न समाजावून घेणार आहे. वरिष्ठ नेत्यांनी चर्चा केल्यावर अन्य उमेदवारांनी माघार घेतली आहे.’

काँग्रेसच्या शहराध्यक्षांची टीका

महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर काँग्रेसचे पूर्व भागाचे अध्यक्ष प्रशांत जगताप नाराज झाले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षावर टीका केली. ते म्हणाले, ‘या मतदारसंघात महाविकास आघाडीची लढण्याची तयारी होती. काँग्रेसचे संख्याबळ जास्त असतानाही राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला ही जागा देण्यात आली. मात्र, उमेदवारी अर्ज मागे घेऊन या पक्षाने विश्वासघात केला.’