पुणे : पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची विधान परिषदेची जागा मिळविण्यासाठी भाजपकडून हालचाली सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने या जागेवर दावा केला आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शुक्रवारी जिल्ह्यातील आमदारांची बैठक घेऊन इच्छुक उमेदवारांची चाचपणी केली.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यातील आमदारांची बारामती होस्टेल येथे बैठक घेऊन पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत आढावा घेतला. तसेच, इच्छुक उमेदवारांबाबत आमदारांशी चर्चा केली. या बैठकीला कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार चेतन तुपे, माजी आमदार सुनील टिंगरे, दिलीप मोहिते, रमेश थोरात आदी उपस्थित होते.

दरम्यान, पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. मात्र, जिल्ह्यात आता भाजपचीही ताकद वाढली आहे. या जागेसाठी नगरपंचायत, नगरपालिका, महापालिका आणि जिल्हा परिषदेचे ८१० सदस्य हे मतदार असणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे ३४४ सदस्य आहेत. त्या खालोखाल भाजपचे ३०५ आणि शिवसेना (शिंदे) पक्षाचे ६८ सदस्य आहेत. त्यामुळे भाजपकडूनही या जागेसाठी दावा केला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बैठक घेऊन या निवडणुकीच्या तयारीचा आढावा आणि इच्छुक उमेदवारांबाबत चाचपणी केली.

बैठकीनंतर राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, ‘पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात ‘राष्ट्रवादी’च्या मतदारांची संख्या जास्त असल्यामुळे या जागेवर ‘राष्ट्रवादी’चाच हक्क असल्याचे पदाधिकाऱ्यांकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना सांगण्यात आले. त्यांच्याकडून इच्छुक उमेदवारांची चाचपणी करण्यात आली. त्यांनी पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील इच्छुक उमेदवारांशी चर्चा केली. त्यांच्याकडून जाहीर करण्यात येणारा उमेदवार मान्य करण्याचे बैठकीत ठरविण्यात आले.’

‘ही निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढवली जाणार असल्याने अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे हे एकत्र बसून निर्णय घेतील,’ असेही भरणे यांनी स्पष्ट केले.

‘उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पुणे जिल्ह्यातील आजी-माजी आमदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची पहिल्यांदाच बैठक घेतली. या बैठकीत पक्ष अधिक मजबूत करणे, कार्यकर्त्यांना न्याय देणे, तालुकास्तरावर संघटना अधिक प्रभावी करण्याबाबत चर्चा झाली,’ असे भरणे यांनी सांगितले.