पुणे : लोहगाव परिसरात अल्पवयीन मुलांकडून वाहनांची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घरासमोर उभ्या असलेल्या वाहनांवर हल्ला करत अज्ञात मुलांनी बेफाम तोडफोड केल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
ही घटना जे. पी. नगर, गल्ली क्रमांक पाच येथे मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. एका ज्येष्ठ नागरिकाच्या घरासमोर उभ्या असलेल्या दुचाकीच्या पेट्रोल टाकीवर लोखंडी वस्तूने घाव घालून नुकसान करण्यात आले. त्याचबरोबर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या इतर वाहनांचीदेखील तोडफोड करण्यात आली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली.
या प्रकरणी तीन ते चार अज्ञात मुलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अद्याप कोणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही. संबंधित मुलांनी वस्तीमध्ये येऊन कोणत्याही कारणाशिवाय वाहनांची तोडफोड केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
दरम्यान, एक दिवस आधी फुरसुंगी परिसरातही अल्पवयीनांकडून वाहनांची तोडफोड झाल्याची घटना समोर आली होती. सलग अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने अल्पवयीनांवर नियंत्रण ठेवण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शहरात अल्पवयीनांकडून वाढत्या बेशिस्त आणि गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत आहे. त्यामुळे अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
कल्याणीनगरमधील स्पा सेंटरवर छापा, वेश्याव्यवसाय उघड, एकाला अटक
कल्याणीनगर परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेला वेश्याव्यवसाय पोलिसांनी उघड केला असून, या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. येरवडा पोलिसांनी छापा टाकून हा प्रकार उघडकीस आणला.
ही कारवाई ईश्वरधाम अपार्टमेंट, जॉगर्स पार्कजवळील ‘निरा स्पा’ मसाज सेंटरमध्ये ३१ मार्चला रात्री करण्यात आली. या प्रकरणी अरमान रहिमउद्दीन हुसेन (वय २१) याला अटक करण्यात आली असून, त्याच्या एका साथीदाराचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमताने मसाज सेंटरच्या नावाखाली संबंधित ठिकाणी कुंटणखाना चालवला होता. पीडित मुलींना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात होता. तसेच, त्यांच्या कमाईवर उपजीविका करत त्यांचे लैंगिक शोषण करण्यात येत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
या प्रकरणी अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यासह संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक दर्शन देवगडे यांनी घटनास्थळी भेट देऊन कारवाई केली असून, पुढील तपास सुरू आहे.
