पुणे : लोहगाव येथील १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय सुरू करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाली असून, हे रुग्णालय राज्य शासनाच्या परवानगीच्या प्रतीक्षेत आहे. रुग्णालय सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन देवमाने यांनी ११ सप्टेंबर रोजी शासनाकडे पाठविला आहे. मात्र, या प्रस्तावाला अद्याप मान्यता मिळालेली नाही.
रुग्णालयातील सुमारे ८० टक्के कर्मचारी भरती पूर्ण झाली असून, बाह्य रुग्ण विभागाची सेवा सुरू करण्यात आली आहे. लोहगाव परिसराची लोकसंख्या सुमारे आठ लाख असून, येथील नागरिकांना रुग्णालयाचा फायदा होणार आहे. त्यांना आता उपचारांसाठी औंध किंवा ससून रुग्णालयात जाण्याची गरज भासणार नाही. सुमारे सहा एकर परिसरात हे रुग्णालय उभारण्यात आले असून, येथे १०० खाटांची व्यवस्था आहे. त्यात १० खाटांचा अतिदक्षता विभाग, प्रसूतिकक्ष, शल्यचिकित्सा विभाग, तसेच विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि अत्यावश्यक उपचारांच्या सुविधा उपलब्ध आहेत.
रुग्णालयात औषधे, शल्यचिकित्सा, स्त्रीरोग, अस्थिरोग, रेडिओलॉजी यांसह १२ ते १३ वैद्यकीय तज्ज्ञ असणार आहेत. हा परिसर विमानतळालगत असल्याने आपत्कालीन आणि गंभीर जखमी रुग्णांसाठीही हे रुग्णालय महत्त्वाचे ठरणार असल्य़ाचे जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून सांगण्यात आले.
‘रुग्णालयाचे बांधकाम सात वर्षांपूर्वी सुरू झाले. त्या वेळी लोहगाव ग्रामपंचायत होती. त्यानंतर हा परिसर पुणे महापालिकेत समाविष्ट झाल्याने बांधकाम पूर्ण झाल्यानंतर विविध प्रशासकीय परवानग्या घेण्याची प्रक्रिया करावी लागली. स्थिरता प्रमाणपत्र, बांधकाम पूर्णत्व प्रमाणपत्र, अग्निशामक विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र, सांडपाणी प्रक्रिया केंद्र परवानगीसह अन्य परवानग्या घेण्यात आल्या आहेत,’ असे डॉ. देवमाने यांनी सांगितले.
सीटी स्कॅन, एमआरआय ‘पीपीपी’वर?
रुग्णालयासाठी सीटी स्कॅन आणि एमआरआय सुविधांचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. या सुविधा सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर सुरू करण्याचे नियोजन आहे. मात्र, त्यासाठी कोणत्या संस्थेची निवड करायची, याचा निर्णय राज्य शासनाच्या स्तरावर होणार आहे. लोहगाव उपजिल्हा रुग्णालयाचे काम पूर्ण झाले आहे. रुग्णालय सुरू करण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. तीन आठवड्यांपूर्वी पत्र पाठवले आहे. सध्या बाह्य रुग्ण विभाग सुरू करण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन देवमाने यांनी दिली.
