पुणे : कौटुंबिक वादातून भावजयीने नऊ महिन्यांच्या बालकाच्या तोंडात फेव्हिक्विक टाकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. फेव्हिक्विक ओतल्याने बालकाच्या तोंडात अंतर्गत जखमा झाल्या असून, त्याच्यावर ससून रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी लोहगाव पोलिसांनी भावजयीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

याबाबत एकाने दिलेल्या फिर्यादीनुसार, भावजयीसह तिच्या नातेवाइकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आणि त्यांचा भाऊ लोहगावमधील कलवड वस्तीत एकत्र राहतात. त्यांच्या कुटुंबात किरकोळ कारणावरून वाद झाले होते. त्यातून भावजयीने ३१ जुलै रोजी दुपारी बाराच्या सुमारास तक्रारदाराच्या नऊ महिन्यांच्या मुलाच्या तोंडात फेव्हिक्विक ओतले. बालकाच्या तोंडात अंतर्गत जखमा झाल्या. हा प्रकार तक्रारदार यांच्या पत्नीच्या निदर्शनास आल्यानंतर त्या घाबरल्या. त्या वेळी तक्रारदार कामावर होते. घाबरलेल्या पत्नीने त्यांच्या मोबाइलवर संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. त्यानंतर नऊ महिन्यांच्या बालकाला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. बालकावर ससून रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे.

तक्रारदाराच्या पत्नीने आरोपी भावजयीला जाब विचारला, तेव्हा, ‘हा प्रकार कोणाला सांगितला, तर जिवंत सोडणार नाही,’ अशी धमकी तिने दिली. भावजयीचे मुंबईतील नातेवाइकही रुग्णालयात आले. त्यांनी, ‘आमच्या मुलीविरुद्ध पोलीस तक्रार दिल्यास तुला दाखवितो,’ अशी धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पद्मराज गंपले या प्रकरणाचा तपास करत आहेत.

नऊ महिन्यांच्या बालकाच्या तोंडात फेव्हिक्विक ओतल्यानंतर त्याला आई-वडिलांनी तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले. त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. बालकावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. बालकाच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे, अशी माहिती लोहगाव पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा पाटील यांनी दिली.