पुणे : अपघातात कुटुंबातील कर्ता व्यक्ती गमाविल्याने कुटुंबीयांना लोक अदालतीत तडजोडीत एक कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला. मोटार अपघात न्यायाधिकरणाचे प्रमुख न्यायाधीश बी. डी. कुलकर्णी आणि ॲड. अतुल गुंजाळ यांच्या पॅनेलसमोर हा दावा निकाली काढण्यात आला.
शहराच्या मध्यभागात दुचाकीस्वाराला एप्रिल २०२४ मध्ये डंपरने धडक दिली. अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला होता. दुचाकीस्वाराच्या कुटुंबीयांनी ॲड. हुसेन बाबुलाल सय्यद, ॲड. दीपाली मोरे यांच्यामार्फत मोटार अपघात न्यायप्राधिकरणाता डंपर मालक आणि डंपरच्या विमा कंपनीविरुद्ध नुकसान भरपाईसाठी दावा दाखल केला. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराला ७० हजार रुपये मासिक वेतन होते.
तो कुटुंबातील कर्ता होता. त्याच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबातील सदस्यांचा विचार करुन जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याची विनंती दाव्यात करण्यात आली. मोटार अपघात न्यायप्राधिकरणाचे प्रमुख न्यायाधीश बी. डी. कुलकर्णी आणि सदस्य ॲड. अतुल गुंजाळ यांच्या पॅनेलसमोर संबंधित दावा मांडण्यात आला. दोन्ही बाजूने दावा निकाली काढण्यावर सहमती दर्शविण्यात आली. विमा कंपनीचे वकील ॲड. ऋषीकेश गानू, विमा कंपनीच्या अधिकारी श्रद्धा पूर्णपात्रे, ॲड. कविता अवस्थी, ॲड. मधुरा कोतवाल, ॲड. यास्मीन शेख, ॲड. जितेंद्र आहेर यांनी दावा निकाली काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
अपघातात जखमी महिलेला ११ लाखांची नुकसान भरपाई
अपघातात जखमी झालेल्या एका महिलेला ११ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय लोकअदालतीत घेण्यात आला. याबाबत एका ५३ वर्षीय महिलेने दावा दाखल केला होता. १४ मार्च २०२४ रोजी महिला एसटीतून मुंबईकडे निघाल्या होत्या. पुनावळे गावाजवळ समोरुन आलेल्या टेम्पोने एसटी बसला धडक दिली. अपघातात त्या जखमी झाल्या. अपघातात त्यांच्या पायाला दुखापत झाली. त्यांना अंशत: अपंगत्व आले. उपचारांसाठी दहा लाख रुपये खर्च आला.
नुकसान भरपाई मिळवण्यासाठी महिलेने ॲड. प्रज्ज्वल गुंजाळ यांच्यामार्फत मोटार अपघात न्यायाधिकरणात दावा दाखल केला. संबंधित टेम्पोचे मालक, तसेच विमा कंपनीविरुद्ध दावा दाखल करण्यात आला होता. संबंधित दावा प्रलंबित होता. तडजोडीसाठी लोकअदालतीत दावा ठेवण्यात आला. अर्जदार महिलेचे वकील गुंजाळ, विमा कंपनीचे वकील पंकज मेहता, विमा कंपनीचे अधिकारी ऋषभ कोठारी यांनी दावा निकाली काढण्यात भूमिका बजावली.
