पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कोथरूड येथील छत्रपती शिवाजी महाराज ते डेक्कन येथील संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत पदयात्रेच आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेत भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, आमदार भीमराव तापकीर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

ही पदयात्रा शहराच्या मुख्य रस्त्यावरुन आयोजित केल्याने नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे जाव लागले. तर दुसर्‍या बाजूला काही गुंड प्रवृत्तीची व्यक्ती देखील पदयात्रेत सहभागी झाली होती, अशी माहिती समोर येत आहे. यावरून महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावर निशाणा साधला. त्या टीकेला भाजपचे प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी देखील चांगलेच प्रत्युत्तर दिल्याचे पाहण्यास मिळाले.

हेही वाचा – पुढील वर्षीच्या विविध स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक युपीएससीकडून जाहीर; नागरी सेवा परीक्षा कधी होणार?

हेही वाचा – पुण्यात गोळीबाराच्या घटनांनंतर आता कोयता गँगचा राडा सुरू

संदीप खर्डेकर म्हणाले की, महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ५० हजाराहून अधिक नागरिक सहभागी झाले होते. ही सर्व गर्दी रविंद्र धंगेकर यांनी निश्चित पाहिली असेल ही विजयाची नांदी असल्याचे त्यांच्या लक्षात आले आहे. त्या पराभवाच्या भीतीपोटी रविंद्र धंगेकर हे आरोप करीत आहे. तसेच या पदयात्रेत एकही गुंड किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीची व्यक्ती नव्हती. जर तशी लोक असतील तर त्यांनी दाखवून द्यावे, आम्ही चौकशी करू, पण त्या ठिकाणी अशा प्रवृत्तीची व्यक्ती नव्हती, अशी भूमिका यावर त्यांनी मांडली.