भुंडी लोकल ते सध्याची बारा डब्यांची ईएमयू लोकल.. असा प्रवास असलेली पुणे- लोणावळा लोकल सध्या दररोज सुमारे ८० ते ९० हजार प्रवाशांच्या प्रवासाची गरज भागविते. दिवसेंदिवस लोकलच्या प्रवाशांमध्ये वाढही होत आहे. मात्र, लोकलचे युनिट व फेऱ्या काही वाढत नाहीत.. अनेक वर्षे प्रवासी मागण्या करून थकले असले तरी रेल्वे प्रशासन ढिम्मच आहे. फेऱ्या वाढविण्यासाठी लोकलचा वेग ताशी शंभर किलोमीटर करण्याचा प्रयोग झाला, पण आठवडाभरातच हा प्रयोग फसला. त्याचे कारण होते सध्याची जुनाट सिग्नल यंत्रणा..!
पुणे-लोणावळादरम्यान प्रवाशांना सेवा देण्यासाठी सध्या लोकलचे चार युनिट आहेत. या लोकल दिवसभरात चाळीसहून अधिक फेऱ्या करतात. विद्यार्थी, छोटे व्यापारी, कामगार यांच्याकडून या सेवेचा प्रामुख्याने लाभ घेतला जातो. कमी खर्चात प्रवास होत असल्याने लोकलच्या सेवेला अनेकांकडून प्राधान्य दिले जाते. प्रवाशांची वाढती संख्या व त्यामुळे डब्यांमध्ये होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता नऊ डब्यांची लोकल बारा डब्यांची करण्याची तब्बल पंधरा वर्षांची मागणी दोन वर्षांपूर्वी पूर्ण झाली. पुणे व पिंपरी-चिंचवड शहर तसेच तळेगाव-लोणावळ्यापर्यंतच्या भागाचा होणारा विस्तार लक्षात घेता, प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आणखी एक लोकल पुण्यासाठी द्यावी व उपलब्ध लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची मागणी प्रवासी अनेक दिवसांपासून करीत आहेत.
पुणे-लोणावळा मार्गावर लोकल किंवा त्यांच्या फेऱ्या वाढविण्यासाठी गाडय़ांचा वेग वाढविणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने या रेल्वे मार्गावरील ओव्हरहेड वीजवाहिन्या डायरेक्ट करंटऐवजी (डीसी) अल्टरनेट करंटवर परावर्तित करण्यात आल्या आहेत. वीज वाहिन्यांची क्षमता वाढल्यामुळे आता लोकलचा वेग ताशी सुमारे १०० किलोमीटर करणे शक्य होऊ शकेल, असे वाटले होते. रेल्वेकडून वेग वाढविण्याचा प्रयोगही काही दिवस झाला. मात्र, काही दिवसांतच हा प्रयोग फसला.
पुणे- लोणावळा मार्गावरून अधिक वेगाने लोकल जाण्यासाठी सध्याच्या सिग्नल यंत्रणेत बदल करून मुंबईप्रमाणे स्वयंचलित सिग्नल यंत्रणेची गरज आहे. आधुनिक सिग्नल यंत्रणा या मार्गावर आल्यास या मार्गावरून इतर गाडय़ाही सध्याच्या वेळेपेक्षा कमी वेळेत पुढे जाऊ शकतील. त्यातून लोकलचा वेगही वाढविणे शक्य होईल. लोकलचा वेग वाढल्यास दोन लोकलच्या मधल्या वेळेमध्ये एखादी फेरी वाढविणे शक्य होणार आहे. मात्र, हे घोडे केवळ सिग्नल यंत्रणेवरच अडलेले आहे.
पुण्याहून लोणावळा एक तासात
पुणे- लोणावळा लोकलला पुणे ते लोणावळा हे अंतर पूर्ण करण्यासाठी सध्या एक तास २५ मिनिटांचा कालावधी लागतो. त्यात सर्व स्थानकांवरील थांबण्याच्या वेळांचाही समावेश आहे. स्वयंचलित सिग्नल यंत्रणा बसविल्यानंतर लोकलचा वेग ताशी १०० किलोमीटपर्यंत झाला, तरी प्रवासातील २५ मिनिटे कमी होईल. प्रत्येक स्थानकावर थांबूनही ही लोकल एक तासामध्ये प्रवास पूर्ण करू शकेल.