पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये कर्कश्य आवाजाच्या विरोधातील लढाईचा पहिला टप्पा यशस्वी झाला असून त्याद्वारे पुणेकरांनी भविष्यातील प्रदूषणमुक्तीची दिशा दाखविली असल्याचा दावा लाऊडस्पिकरविरोधी पुणेकर मंचने केला आहे.
पुण्यातील गणेशोत्सव पूर्वतयारीच्या सभेमधून विद्यानंद बापट यांना बाहेर काढल्यानंतर आणि सप्टेंबरमध्ये त्यांना मारहाण केली गेल्यामुळे सामान्य पुणेकराला धक्का बसला. मध्यमवर्गीय जेष्ठ नागरिकांना आपला आवाज असा दडपशाहीने दाबला जाणार असेल तर त्या विरोधात उतरायला पाहिजे ही भावना तयार झाली आणि त्यातूनच लाऊडस्पीकरविरोधी पुणेकर मंच नावाने लोक एकत्र आले. पुणेकरांच्या पुढाकाराने प्रथम कलाकारकट्टा येथे आंदोलन आणि स्वारगेट येथे मोर्चा काढण्यात आला.
विविध मागण्यांबाबत पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले आणि त्यानंतर लाऊडस्पीकरविरोधी पुणेकर मंचाच्या पुढाकाराने झाशीची राणी पुतळा चौक ते पुणे महानगरपालिका असा मोर्चा काढण्यात आला. सामान्य पुणेकर कोणताही राजकीय झेंडा न घेता रस्त्यावर उतरला. या काळात या मंचाच्या पुढाकाराने शहरातील ३५ हून अधिक डॉक्टरांनी मिळून या आरोग्यास अपायकारक आवाजाच्या विरोधात पुणेकरांना आवाहन केले.

गणेश चतुर्थीनंतर (१४ सप्टेंबर) पोलिसांच्या ११२ क्रमांकावर तक्रार दाखल केल्यानंतर त्याची फारशी दखल घेतली जात नाही असे लक्षात आल्याने आणि तक्रारदारास त्याचे नाव उघड होईल ही भीती असल्याने नवीन सॉफ्टवेअर फॉर्म तयार करून त्या मार्फत थेट पोलीस आयुक्तांना रियल टाईम ईमेल पाठवण्यात आल्या. या सर्व काळात एकूणच आवाजाची मर्यादा बरीच पाळली गेली त्यामुळे लोकांनाही निश्चितपणे आनंद वाटला. दरम्यान मुंबई उच्च न्यायालयामध्ये आणि त्याआधी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने ( एनजीटी) सुद्धा या संदर्भामध्ये आदेश दिले गेले. यापुढील काळामध्ये हे आदेश दिशादर्शक ठरणार आहेत.
विसर्जनाच्यादिवशी मात्र अनेक ठिकाणी ही आवाजाची डेसिबल मर्यादा पाळली गेली नसल्याच्या तक्रारी आल्या. पोलिसांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दूरध्वनी क्रमांक जाहीर केले. परंतु, अनेक ठिकाणी लोकांचा अनुभव फारसा चांगला नव्हता. तक्रार दाखल केल्यावर थोड्यावेळापुरता आवाज कमी होत होता. अनेक ठिकाणी तक्रारीचे निवारणच होत नव्हते. लाऊडस्पीकरविरोधी पुणेकर मंचाच्या तक्रार निवारण अर्जांमधून काही माहिती दिसून आली.
यापुढील काळात पुणेकरांची लढाई ही प्रामुख्याने कर्णकर्कश्य आवाजाविरोधामध्ये असेल मग तो कुठल्याही धर्माचा,जातीचा अथवा राजकीय पक्षाचा कार्यक्रम मिरवणूक असेल, त्याला या मंचातर्फे आणि पुणेकरांकर्फे विरोध केला जाईल. पुण्याच्या प्रथम नागरिक असलेल्या महापौर मंजूषा नागपुरे आणि भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी या विरोधात विधाने केली. परंतु, पुणेकरांनी आपला आग्रह पोलिसांच्या मदतीने आणि न्यायालयाच्या आदेशाच्या सहाय्याने लावून धरला.
थर्माकोल बंदी, निर्माल्य आणि मूर्ती विसर्जन नदी पात्रात न करणे, रात्री ध्वनिवर्धक बंद करणे याबाबत गणेश मंडळानी बदल स्वीकारला आहे , तसाच बदल ही गणेश मंडळे व इतर धार्मिक, राजकीय संस्था कार्यकर्ते स्वीकारतील अशी आशा आहे. या नागरी आंदोलनास आलेले यश हे पहिल्या टप्प्यावरचे असून यातूनच भविष्यातील पुणेकर मंचाचे प्रदूषण मुक्तीचे काम महाराष्ट्रासाठी दिशादर्शनाचे ठरेल अशी आशा आहे, अशी प्रतिक्रिया मंचचे समन्वयक मुकुंद किर्दत यांनी व्यक्त केली.
पुणे शहर विभागापुरता सारांश (एकूण १५८ नोंदी)
एकूण कल – तक्रारी प्रामुख्याने तीन दिवसांभोवती केंद्रित आहेत:
१४ सप्टेंबर (१९ तक्रारी) -गणेश चतुर्थी
२० सप्टेंबर (२७ तक्रारी) – मध्य उत्सवातील विसर्जन दिन व वीकेंड वाढ
२५ सप्टेंबर (५९ तक्रारी, एकूणपैकी ३७ टक्के) – विसर्जनाचा दिवस
डेसिबल पातळी – १५८ पैकी ६० तक्रारींमध्ये (३८%) १०० डेसिबल्स किंवा त्याहून अधिक नोंदवले गेले
पोलीस तक्रार – ९१ जणांनी पोलिसांकडेही (११२ व्हाॅट्सॲप) तक्रार नोंदवल्याचे सांगितले
हॉटस्पॉट भाग – बाजीराव रस्ता, नातूबाग गणपती मंडळ या एकाच पट्ट्यातून १८ तक्रारी आल्या. इतर वारंवार आढळणारे भाग – कोथरूड (७), हिंगणे खुर्द (५), धनकवडी (४), कोरेगाव पार्क (४), आंबेगाव (४)
