पुणे : ‘मोठा आवाज येतो म्हणूनच त्या उपकरणाला लाऊडस्पिकर म्हटले जाते. सार्वजनिक सण-उत्सवाच्या सबबीखाली खुल्या वातावरणात ध्वनिवर्धक (लाऊडस्पीकर) वाजवण्याची परवानगी देता कामा नये. शांततेमध्ये जगणे हा माणसाचा मूलभूत अधिकार आहे. रात्री बारा ते पहाटे सहा एवढाच वेळ नव्हे तर २४ तासही सार्वजनिक ठिकाणी ध्वनिवर्धकावर बंदी असली पाहिजे,’ असे आग्रही मत ध्वनिप्रदूषणाविरोधात भूमिका घेणारे विद्यानंद बापट यांनी रविवारी मांडली. ‘उत्सवखोरांचे प्रबोधन करणे हा मूर्खपणा ठरेल, अशी टिप्पणी करून बापट यांनी ‘हजार कावळे कावकाव करत असतील तर कोकिळेचे कूजन ऐकू येणारच नाही,’ याकडे लक्ष वेधले.

मधुरजग फाउंडेशन, ब्राइट्स सोसायटी, विचारवेध यांच्या वतीने ‘आवाज शांततेचा’ कार्यक्रमात विद्यानंद बापट यांचा सत्कार ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी बापट बोलत होते. प्रसिद्ध अभिनेत्री चिन्मयी सुमित, अभिनेते सुमित राघवन, सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी आणि कुमार नागे या वेळी उपस्थित होते.

बापट म्हणाले, ‘सध्या पेठांमध्ये राहणे ही एक शिक्षा झाली आहे. सणांच्या काळात तर हे आणखी अवघड होत असेल तर उत्सवखोरांना शिक्षा झाली पाहिजे. पण, इथे शिक्षा सामान्य माणसांना होते. शांतता आणि निर्भयपणे जगणे हा मूलभूत अधिकार आहे. ध्वनिप्रदूषण आणि रहदारीस अडथळा याचे तार्किक समर्थन करता येत नाही. लाऊडस्पीकर हा उत्सवाचा अविभाज्य भाग कधीच नव्हता. मग ते धर्माची ढाल पुढे करतात. प्रथा परंपरा म्हणून कोणत्याही गोष्टी सुरू ठेवता येत नाही. वैज्ञानिक दृष्टिकोन ऐहिक समस्या सोडवण्यासाठी उपयोगी आहे.’

पालेकर म्हणाले, ‘ध्वनिप्रदूषण आणि सामान्यांना होणारा त्रास याविषयी विद्यानंद बापट यांनी भाष्य केले. त्याचा परिणाम म्हणून मुंबई उच्च न्यायालयाने यामध्ये लक्ष घातले आहे. त्यांनी या भूमिकेचा पुनरुच्चार करत राहणे महत्त्वाचे आहे. विद्यानंदचे काम हा नागरिकाने व्यवस्थेविरुद्ध केलेल्या संघर्षाचे प्रतिनिधित्व करतो. संघर्ष करण्याची तयारी प्रत्येकाने ठेवली पाहिजे. नदीपात्रातील किंवा पादचारी मार्गावरचे अतिक्रमण, रस्ते दुरुस्ती, कचरा व्यवस्थापन अशा विषयांमध्ये वैयक्तिक पातळीवर विरोध केला पाहिजे.’

चिन्मयी सुमित म्हणाल्या, समाजामध्ये अविवेकी गोंधळ असताना काहीतरी करायला हवे असे वाटते. माझी पिढी विचारच करत बसली. विद्यानंद आपल्या भूमिकेपासून ढळत नाही. गरज असेल किंवा नसेल तरीही सोबतीची खात्री देते.’ सुमित राघवन म्हणाले, संस्कृत आणि संस्कृतीपेक्षा सुसंस्कृत असणे महत्त्वाचे आहे. शांतता हा शब्द केवळ पुस्तकात राहिला आहे. विचारांची पातळी खालावली. आवाजाची पातळी वाढली. प्रत्येकामध्ये विद्यानंद आहे. फक्त ते बोलण्याचे तो धाडस करत नाही. हे खूप आधी करायला हवे होते. हा जागर वाढत रहावा.