पुणे : मिरवणुकीत उच्च क्षमतेची ध्वनिक्षेपक यंत्रणा वापरून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी लोहियानगरमधील एका मंडळाच्या अध्यक्षांसह उपाध्यक्ष आणि ध्वनिक्षेपक यंत्रणा पुरविणारा व्यावसायिक यांना न्यायालयाने दंडात्मक शिक्षा सुनावली; तसेच ध्वनिक्षेपक यंत्रणा जप्त करण्यात आली.

अल मदिना यंग बाॅइज यंग सर्कलचे अध्यक्ष वाहिद कासीम मणियार, उपाध्यक्ष जावेद मजीद शेख (दोघे रा. लोहियानगर, घोरपडे पेठ), ध्वनिक्षेपक यंत्रणा पुरविणारा व्यावसायिक प्रकाश कृष्णात अस्वले (रा. सावर्डे बुद्रुक, ता. कागल, जि. कोल्हापूर) अशी शिक्षा सुनावलेल्यांची नावे आहेत. २६ ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलादनिमित्त काढलेल्या मिरवणुकीत ध्वनिक्षेपक यंत्रणा वापरबाबत पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी आदेश दिले होते.

‘सर्वोच्च न्यायालयाने ध्वनिक्षेपक वापराबाबत दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला होता. लोहियानगर येथील अल मदिना यंग बाॅइज सर्कलकडून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत उच्च क्षमतेची ध्वनिक्षेपक यंत्रणा वापरण्यात आली होती. खडक पोलिसांनी ध्वनिक्षेपक यंत्रणेचा आवाज कमी करण्याबाबत वारंवार सूचना दिली होती. मात्र, न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्याप्रकरणी खडक पोलिसांनी मंडळाच्या अध्यक्षांसह तिघांविरुद्ध न्यायालयाचे आदेशांचे पालन न केल्या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता कलम २२३, २९२ नुसार गुन्हा दाखल केला.

खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर त्वरित न्यायालयात संबंधितांविरुद्ध २४ तासांच्या आत आरोपपत्र दाखल केले. न्यायालयाने मंडळाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, तसेच ध्वनिक्षेपक पुरविणाऱ्या व्यावसायिकाला दोषी ठरवून शिक्षा सुनावली,’ अशी माहिती परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले यांनी दिली.

पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सहआयुक्त संजय दराडे, अतिरिक्त आयुक्त राजेश बनसाेडे, उपायुक्त रावले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय पिंगळे, गुन्हे शाखेच्या निरीक्षक शर्मिला सुतार, समाधान पवार, सहायक निरीक्षक अमोल वळसंग, स्वप्नील बनकर, राजाराम गाढवे, भूषण चव्हाण, कल्याण घोरपडे यांनी ही कारवाई केली.