पुणे : शहरातील वाढत्या वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी शिवाजीनगर आणि पेठ परिसरात ‘लो एमिशन झोन’ (कमी प्रदूषण क्षेत्र) लागू करण्याबाबत प्रशासनाकडून विचारमंथन सुरू आहे. या क्षेत्रात जास्त प्रदूषण करणाऱ्या वाहनांना प्रवेशासाठी विशेष प्रदूषण शुल्क आकारण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. दरम्यान, या संदर्भातील कार्यवाहीसाठी संबंधित विभागांकडून सविस्तर आराखडा तयार करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी या बैठकीत दिले.
शहरातील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यलयात विविध तज्ज्ञ, संस्था आणि संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, पुणे महानगरपालिकेचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि वाहतूक नियोजन क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित होते.
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर तसेच मध्यवर्ती पेठ परिसरात ‘लो एमिशन झोन’ लागू करण्याचा विचार आहे. या क्षेत्रात ‘भारत स्टेज-३’ किंवा त्यापेक्षा जुन्या इंजिन तंत्रज्ञानाच्या वाहनांना प्रवेशासाठी दररोज प्रदूषण शुल्क आकारले जाण्याचे सूतोवाच करण्यात आले आहे. संबंधित शुल्क आगाऊ भरले नसल्यास नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. पुढील टप्प्यात ही अट ‘भारत स्टेज-४’ वाहनांनाही लागू करण्याचा तसेच ‘लो एमिशन झोन’चा विस्तार शहरातील अन्य भागांमध्ये करण्याचा विचार प्रशासन करत आहे. या व्यवस्थेची अंमलबजावणी कॅमेऱ्यांच्या माध्यमातून करण्याचा प्रस्तावही बैठकीत मांडण्यात आला.
बैठकीत जास्त प्रदूषण करणाऱ्या वाहनांच्या वापरावर नियंत्रण ठेवण्याबरोबरच शहरातील पदपथ अधिक चालण्यायोग्य करणे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करणे, बससेवा वाढविणे तसेच नागरिकांना स्वच्छ व पर्यायी वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देणे यांसारख्या उपाययोजनांवरही चर्चा करण्यात आली.
‘लो एमिशन झोन’चा विचार का?
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील वायू प्रदूषणाचे प्रमुख कारण वाहने असल्याचे विविध अभ्यासांमधून स्पष्ट झाले आहे. सन २०२० मध्ये झालेल्या अभ्यासानुसार, पुणे महानगर परिसरातील एकूण सूक्ष्म कण (पीएम २.५) प्रदूषणापैकी सुमारे ४६ टक्के प्रदूषण वाहनांमुळे होत असल्याचे आढळले. तसेच, २०२३ मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार, पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीवर चालणाऱ्या सुमारे ७० टक्के वाहनांमध्ये ‘भारत स्टेज-४’ किंवा त्यापेक्षा जुने इंजिन दिसले. अभ्यासानुसार २००० पूर्वी नोंदणी झालेली एक कार जवळपास ११ आधुनिक ‘भारत स्टेज-६’ कारइतके प्रदूषण करते, तर जुन्या तंत्रज्ञानाच्या एका ट्रकमुळे सुमारे १४ आधुनिक ट्रकइतके प्रदूषण होते. तसेच ‘भारत स्टेज-६’ डिझेल कारमधून होणारे सूक्ष्म कणांचे उत्सर्जन ‘भारत स्टेज-३’ डिझेल कारपेक्षा सुमारे ९० टक्के कमी असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
