पुणे : व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलिंडरचा पुरवठा बंद करण्यात आल्याने हॉटेलांना फटका बसू लागला आहे. शहरातील १० ते १५ टक्के हॉटेल बंद झाली आहेत. अनेक हॉटेलचालकांनी खाद्यपदार्थांची संख्या कमी करून आणि इतर इंधन पर्यायांद्वारे व्यवसाय सुरू ठेवण्याची कसरत सुरू ठेवली आहे. पुढील दोन ते तीन दिवसात एलपीजी सिलिंडर पुरवठा न झाल्यास सर्वच हॉटेलांसमोर व्यवसाय बंद करण्याशिवाय कोणताही पर्याय उरणार नाही.

याबाबत नॅशनल रेस्टॉरन्ट असोसिएशन ऑफ इंडियाच्या पुणे चॅप्टरच्या अध्यक्षा सायली जहागीरदार म्हणाल्या, की केंद्र सरकारने हॉटेल व्यवसायासाठी एलपीजी सिलिंडरचा पुरवठा करण्याचे जाहीर केले आहे. प्रत्यक्षात कंपन्यांनी याबाबत अद्याप आदेश आले नसल्याचे कारण पुढे केले आहे. हॉटेल व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर आहे. सध्या शहरातील १० ते १५ टक्के हॉटेल बंद झालेली आहे. अनेक हॉटेलचालक विजेची शेगडी आणि इतर इंधन पर्यायांकडे वळले आहेत. मात्र, त्यावर पूर्ण क्षमतेने व्यवसाय करणे शक्य नाही. मोजक्या खाद्यपदार्थांसह व्यवसाय सुरू ठेवण्याचे प्रयत्न हॉटेलचालक करीत आहेत. पुढील दोन ते तीन दिवसांत पुरवठा न झाल्यास सर्वच हॉटेलांना व्यवसाय करणे अशक्य बनेल.

एलपीजी सिलिंडरचा पूर्ण पुरवठा बंद न ठेवता काही प्रमाणात कपात करून पुरवठा सुरू करावा, अशी हॉटेलचालकांची मागणी आहे. पुण्याचा विचार करता हॉटेल क्षेत्रावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे १५ ते १८ लाख रोजगार अवलंबून आहेत. त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न आता निर्माण झाला आहे. याचबरोबर हॉटेल व्यवसायावर अवलंबून असलेले भाजीवाले, चिकन, मटण आणि अंडी विक्रेत्यासह इतर व्यावसायिकांची परिसंस्था धोक्यात आली आहे, असे जहागीरदार यांनी स्पष्ट केले.

‘एमएनजीएल’कडून पुढाकार

शहरात महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडकडून (एमएनजीएल) पाइप्ड नॅचरल गॅसचा (पीएनजी) पुरवठा केला जातो. सध्या पीएनजी पुरवठा सुरळीत सुरू आहे. त्यामुळे पीएनजी जोडणी असलेली हॉटेल व्यवस्थितपणे सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर पीएनजी जोडणी नसलेल्या हॉटेलचालकांची एमएनजीएलने शुक्रवारी बैठक घेतली. या बैठकीत हॉटेलचालकांना कमीत कमी वेळेत पीएनजी जोडणी देण्यासाठी एमएनजीएलने पुढाकार घेतला. याचबरोबर जोडणीसाठी भराव्या लागणाऱ्या ठेव रकमेत सवलतही देण्याची तयारी दर्शविली. या बैठकीला शहरातील १५० ते २०० हॉटेलचालक उपस्थित होते. या हॉटेलचालकांना तातडीने जोडणी देण्याबाबत कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.