पुणे : पश्चिम आशियातील युद्धामुळे निर्माण झालेल्या लिक्विफाईड पेट्रोलिअम गॅसच्या (एलपीजी) टंचाईचे चटके पुणेकरांना आता आणखी बसू लागले आहेत. जिल्हा प्रशासनाने घरगुती एलपीजी सिलिंडरचा पुरेसा साठा असल्याचा दावा केला असला, तरी प्रत्यक्षात नागरिकांना सिलिंडर मिळत नसल्याचे चित्र आहे. याच वेळी ग्राहकांच्या नावाने परस्परनोंदणी करून त्याचा काळाबाजार करण्याचे प्रकार आता समोर येऊ लागले आहेत. गॅस सिलिंडरचे हे गौडबंगाल आता उघडकीस येऊ लागले आहे.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जिल्ह्यात घरगुती एलपीजी सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून, पुरवठा नियमितपणे सुरू असल्याचा दावा केला होता. प्रत्यक्षात एलपीजी सिलिंडर टंचाईची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. शहरातील गॅस वितरकांच्या कार्यालयाबाहेर नागरिकांच्या रांगा लागत आहेत. त्यातच सिलिंडरची नोंदणी होत नसल्याने नागरिक धास्तावले आहेत. याच वेळी नोंदणी झालेल्या ग्राहकांना तो कधीपर्यंत मिळेल, याचेही उत्तर वितरकांकडून मिळत नाही. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पुरवठा विभागाकडून सर्व गॅस वितरकांवर देखरेख ठेवण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र, वितरकांकडून एलपीजी सिलिंडरचा काळाबाजार सुरू असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. ग्राहकांनी सिलिंडरची मागणी न नोंदविताही त्यांच्या नावाने नोंदणी झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. याचबरोबर हे सिलिंडर वितरित झाल्याचे लघुसंदेशही ग्राहकांना मोबाइलवर येत आहेत. प्रत्यक्षात वितरकांकडून या सिलिंडरची परस्परविक्री करून काळाबाजार सुरू असल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत.
जिल्ह्यातील एलपीजी सिलिंडर पुरवठ्याबाबत जिल्हा प्रशासनाने वितरकांना सूचना केल्या आहेत. सिलिंडर पुरवठ्याचा कालावधी शहरी भागात २५ दिवस आणि ग्रामीण भागात ४५ दिवस करण्यात आला आहे. याबद्दल माहिती नसल्याने ग्राहकांकडून आधीच नोंदणी करण्याचा प्रयत्न केला जातो आणि ती पूर्ण होत नाही. एलपीजी सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी पथकांकडून तपासणी केली जात आहे. – महेश सुधाळकर, जिल्हा पुरवठा अधिकारी
मी सिलिंडरची नोंदणी न करताही माझ्या नावाने मागणी नोंदविण्यात आली. याबद्दल मोबाइलवर लघुसंदेश आल्याने मला शंका आली. माझ्या वतीने सिलिंडरचे पैसे भरण्यात आल्याचेही दाखविण्यात आले होते. वितरकाकडे चौकशी केली असता, सिलिंडर वितरित झाल्याचेही सांगण्यात आले. मी पाठपुरावा केल्यानंतर अखेर वितरकाने सिलिंडर दिला. – ग्राहक
