पुणे : पश्चिम आशियातील युद्धामुळे देशात लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस (एलपीजी) आणि पाइप्ड नॅचरल गॅस (पीएनजी) पुरवठ्याचे संकट निर्माण झाल्याने पुण्यातील उद्योगांसह घरगुती ग्राहकांना याचे चटके बसू लागले आहेत. घरगुती ग्राहकांना नवीन सिलिंडरची मागणी नोंदवता येत नसल्याची स्थिती असून, उद्योगांसाठीचा पीएनजी पुरवठा खंडित आहे. हॉटेलांचा सिलिंडर पुरवठा बंद करण्यात आल्याने त्यांच्या व्यवसायावर गदा आली आहे.

घरगुती ग्राहकांमध्ये भीती

केंद्र सरकारने घरगुती ग्राहकांना प्राधान्याने एलपीजी सिलिंडरचा पुरवठा करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रत्यक्षात ग्राहकांना नवीन सिलिंडरसाठी मागणी नोंदविता येत नसल्याचे चित्र आहे. याबाबत वितरकांकडूनही स्पष्ट उत्तर दिले जात नसल्याने नागरिकांमध्ये भीती आणि गोंधळाचे वातावरण आहे. जिल्हा प्रशासनाने मात्र कोणतीही गॅसटंचाई नसल्याचा खुलासा केला आहे. ‘जिल्ह्यातील सर्व एलपीजी वितरक, तसेच तेल कंपन्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार घरगुती गॅस सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. नागरिकांना नियमितपणे गॅस सिलिंडरचा पुरवठा होत असून, कोणतीही टंचाई निर्माण झालेली नाही,’ असे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.

उद्योगांच्या पुरवठ्यात कपात

केंद्र सरकारने दिलेल्या सूचनांनुसार उद्योगांना त्यांच्या मागणीच्या ८० टक्के पीएनजी पुरवठा करण्यात येत आहे. पुरवठ्यात २० टक्के कपात करण्यात आली आहे. उद्योगांनी सध्या करण्यात येणाऱ्या पुरवठ्यानुसार कामकाजाचे नियोजन करावे, अशी सूचना देण्यात आली आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्या (एमएनजीएल) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारच्या सूचनांनुसार ‘एमएनजीएल’कडून घरगुती ग्राहकांना मात्र १०० टक्के पुरवठा केला जात आहे. कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसच्या (सीएनजी) पुरवठ्यातही सध्या कोणतीही कपात करण्यात आलेली नसून, ते पूर्वीप्रमाणे सुरू आहे.

छोट्या हॉटेलांना फटका

‘हॉटेलांसाठी व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलिंडरचा पुरवठा बंद करण्यात आला आहे. त्याचा फटका प्रामुख्याने हातगाड्यांवर खाद्यपदार्थ बनविणारे विक्रेते आणि छोट्या हॉटेलचालकांना बसला आहे. त्यांच्याकडे सिलिंडरचा साठा मर्यादित असल्याने ते व्यवसाय बंद करू लागले आहेत. मोठ्या हॉटेलांकडे सिलिंडरचा साठा असल्याने ते खाद्यपदार्थांची संख्या कमी करून व्यवसाय सुरू ठेवत आहेत. अनेक हॉटेलांनी जास्त गॅसची आवश्यकता असलेले डोसा, तसेच इतर पदार्थ दिवसभर देणे बंद केले आहे. ग्राहकांना ठरावीक वेळेतच हे पदार्थ दिले जात आहेत. मोठ्या हॉटेलांचा व्यवसायही पुढील दोन दिवसांत बंद होईल,’ अशी माहिती पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेलिअर्स असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी यांनी दिली.

उद्योग अडचणीत

उद्योगांच्या पीएनजी पुरवठ्यात कपात करण्याच्या सूचना सरकारने केल्या असल्या, तरी प्रत्यक्षात त्यांचा पुरवठाच बंद करण्यात आला आहे. वितरकांकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. त्यामुळे उद्योगांसमोर समस्या निर्माण झाल्या आहेत. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन जिल्हा उद्योग केंद्राच्या साहाय्याने समन्वय बैठक घेऊन उद्योगांचा गॅसपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरचे महासंचालक प्रशांत गिरबने यांनी केली.

राजकीय नेत्यांचे दुर्लक्ष

हॉटेल आणि रेस्टॉरंटसमोरील गॅस टंचाईची समस्या भीषण बनली आहे. दुर्दैवाने कोणताही राजकीय पक्ष अथवा नेतृत्व या संकटाकडे गांभीर्याने पाहण्यास तयार नाही. सध्या हॉटेलचालकांकडून त्यांच्या पातळीवर व्यवसाय चालू ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. अनेक जण कोळसा शेगडी, इलेक्ट्रिक शेगडी आणि लाकूड या पर्यायांचा वापर करीत आहे. गॅस टंचाईच्या मुद्द्यावर नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांबरोबर ‘एमएनजीएल’च्या अधिकाऱ्यांची उद्या सकाळी तातडीने बैठक आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती पुणे रेस्टॉरन्ट अँड केटरिंग असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. किशोर सरपोतदार यांनी दिली.

रुग्णालये, वसतिगृहांना प्राधान्य

जिल्हा प्रशासन व जिल्हा पुरवठा विभागामार्फत सर्व गॅस एजन्सींवर देखरेख ठेवण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हास्तरीय, तसेच तालुकास्तरीय फिरती व दक्षता पथके नेमण्यात आली आहेत. कोणत्याही वितरकाकडून कृत्रिम टंचाई निर्माण करणे, जादा दराने विक्री करणे किंवा इतर अनियमितता आढळल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. रुग्णालयासारख्या अत्यावश्यक सेवांना, तसेच विद्यार्थ्यांच्या शासकीय वसतिगृहांना गॅस सिलिंडरचा पुरवठा प्राधान्याने करण्यात यावा, असे जिल्हाधिकारी
जितेंद्र डुडी यांनी स्पष्ट केले.