पुणे : करोना संकटानंतर देशभरात मोठ्या आणि आलिशान घरांना ग्राहकांकडून जास्त पसंती मिळू लागली. पुण्यातही आलिशान घरांच्या मागणीत मोठी वाढ नोंदविण्यात आली. यामुळे गेल्या तीन वर्षांत पुण्यात आलिशान घरांच्या किमतीत २९ टक्क्यांची वाढ झाली आहे. पुण्यात आलिशान घरांचा दर प्रतिचौरस फूट १५ हजार २०० रुपयांवर पोहोचला आहे.

अनारॉक ग्रुपने २०२२ ते २०२५ या तीन वर्षांच्या कालावधीतल गृहनिर्माण क्षेत्राचा अहवाल जाहीर केला आहे. या अहवालानुसार, देशात करोना संकटानंतर आलिशान म्हणजेच १.५ कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमत असलेल्या घरांच्या मागणीत मोठी वाढ झाली. देशात गेल्या तीन वर्षांत आलिशान घरांच्या किमतीत सरासरी ४० टक्के वाढ झाली आहे. या घरांचा सरासरी दर २०२२ मध्ये प्रति चौरसफूट १४ हजार ५३० रुपये होता. आता या वर्षांच्या अखेरीस तो २० हजार ३०० रुपयांवर पोहोचला आहे.

गेल्या तीन वर्षांत मध्यम म्हणजेच ४० लाख रुपये ते १.५ कोटी रुपये किमतीच्या घरांच्या किमतीत ३९ टक्के वाढ झाली आहे. या घरांचा सरासरी दर तीन वर्षांत ६ हजार ८८० रुपयांवरून ९ हजार ५३७ रुपयांवर गेला आहे. याच वेळी परवडणाऱ्या म्हणजेच ४० लाख रुपयांपर्यंत किंमत असलेल्या घरांच्या किमतीत २६ टक्के वाढ झाली आहे. या घरांचा सरासरी तीन वर्षांत ४ हजार २२० रुपयांवरून ५ हजार २९९ रुपयांवर गेला आहे.

श्रीमंत आणि अतिश्रीमंतांकडून आलिशान घरांना मागणी वाढत आहे. मागणी अधिक असल्याने या घरांच्या किमतीतही वेगाने वाढ झाली आहे. पुण्याचा विचार करता गेल्या तीन वर्षांत आलिशान घरांच्या किमतीत २९ टक्के वाढ झाली आहे. या घरांचा सरासरी दर तीन वर्षांत प्रतिचौरस फूट १५ हजार २०० रुपयांवर पोहोचला आहे. याच वेळी मध्यम घराच्या किमतीत २१ टक्के वाढ होऊन हा दर ८ हजार ८५० रुपये झाला आहे. तसेच, परवडणाऱ्या घरांच्या किमतीत २२ टक्के वाढ होऊन हा दर ५ हजार ८५० रुपये झाला आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

ग्राहकांची वाढती पसंती

मोक्याच्या ठिकाणी असलेल्या आणि मोठ्या विकासकांच्या आलिशान गृहप्रकल्पांना ग्राहकांची पसंती मिळत आहे. त्यामुळे त्यांच्या मागणीत वाढ होऊन पर्यायाने किमतीही वाढताना दिसत आहेत. त्या तुलनेत परवडणाऱ्या घरांची मागणी कमी असल्याने त्यांच्या किमतीतील वाढ कमी आहे, असे अनारॉक ग्रुपचे अध्यक्ष अनुज पुरी यांनी स्पष्ट केले.