पुणे : गेल्या पंधरा दिवसांत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या (महावितरण) पुणे विभागाने १ हजार २८१ वीजचोरांवर कारवाई केली. त्यांना ३ लाख ४० हजार ७३० युनिट विजेच्या चोरीसाठी ८१ लाख ५५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
महावितरणच्या संचालन विभागाचे संचालक धनंजय औंढेकर यांनी नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत वीजचोरांवर धडक मोहिमेद्वारे कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार १ ते १६ जुलै या कालावधीत पुणे विभागाचे मुख्य अभियंता सुनिल काकडे यांच्या नेतृत्त्वात विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत मीटरमध्ये फेरफार करणाऱ्या, आकडा किंवा केबल टाकून वीजचोरी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. त्याशिवाय घरगुती ग्राहकांकडून वेगळ्या कारणांसाठी वीजवापर करणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याची माहिती महावितरणकडून निवेदनाद्वारे देण्यात आली.
पुणे ग्रामीण विभागात सर्वाधिक ५८० वीजचोरांवर कारवाई करण्यात आली. त्यांना १ लाख ३६ हजार ९३० युनिट वीजेच्या चोरीसाठी २९ लाख ८२ हजार ६६० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. या विभागातील मोहिमेचे नेतृत्त्व अधीक्षक अभियंता सुरेश सवाईराम यांनी केले. रास्तापेठ विभागात ३७५ वीजचोरांवर कारवाई करण्यात आली. त्यांना ९० हजार ७९९ युनिट वीजेच्या चोरीसाठी २३ लाख ३० हजार ८८० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. या मोहिमेचे नेतृत्त्व रास्ता पेठ विभागाचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी केले.
गणेशखिंड विभागात ३२६ वीजचोरांवर कारवाई करण्यात आली. त्यांना १ लाख १३ हजार ००१ युनिट वीजेच्या चोरीसाठी २८ लाख ४२ हजार १९० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड यांनी या मोहिमेचे नेतृत्त्व केले. दरम्यान, वीजेची चोरी करणे गुन्हा आहे. त्यासाठी दंडाबरोबर कारवासाची शिक्षाही होऊ शकते. तसेच वीजचोरी करताना अपघाताचाही धोका निर्माण होतो. त्यामुळे नागरिकांनी अधिकृत वीज जोडण्यांद्वारेच वीजेचा वापर करावा, असे आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता सुनिल काकडे यांनी केले आहे.
‘वर्षभरात २ हजार २८३ वीजचोरांवर कारवाई’
महावितरणच्या पुणे विभागात एप्रिल २०२५ ते जुलै २०२६ या कालावधीत २ हजार २८३ वीजचोरांवर कारवाई करण्यात आली. या वीजचोरांना ८ लाख ७४ हजार ५५९ युनिटच्या वीजचोरीसाठी ७ कोटी ६१ लाख ३१ हजार ६९० रुपयांचा दंड आकारण्यात आल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.
